विधानसभेत तैनात असलेल्या २८ वर्षीय पोलिसाला बाधा

बदलापूर : बदलापुरात ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आहे. विधानसभा आवारात तैनात असलेल्या २८ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. या रुग्णाला पालिकेच्या गौरी सभागृहातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णाचा अहवाल २५ डिसेंबर रोजी प्राप्त झाला होता. मात्र, पालिकेला ही माहिती ३० डिसेंबरला देण्यात आली. गुरुवारी या रुग्णाबाबतची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेला मिळाली. २५ डिसेंबर रोजी या रुग्णाला ओमाक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्याबाबतच अहवाल सर जे.जे. रुग्णालयाकडून प्राप्त झाला होता. त्यानंतर हा रुग्ण घरीच विलगीकरणात होता, अशी माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली आहे.

गुरुवारी या रुग्णाची माहिती मिळताच पालिकेच्या पश्चिमेतील गौरी सभागृहातील करोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाची तब्येत सध्या चांगली आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नसल्याचेही डॉ. अंकुश यांनी सांगितले आहे. हा रुग्ण विधानभवन परिसरात हिवाळी अधिवेशन काळात सुरक्षेसाठी तैनात होता. येथे चाचणी केल्यानंतर २५ डिसेंबरला याबाबत माहिती समोर आली. हा रुग्ण बदलापुरात आपल्या पत्नीसह राहतो.

माहिती मिळण्यात दिरंगाई

करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचा जिल्ह्यातला पहिला रुग्ण डोंबिवलीत आढळल्यानंतर जिल्ह्यातल्या इतर शहरांमध्ये परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती स्थानिक प्रवाशांना दिली जात होती. मात्र अशी माहिती अंबरनाथ, बदलापूर शहरांना मिळाली नव्हती. त्यामुळे पालिका स्तरावर संभ्रमाची स्थिती होती. आताही बदलापुरात आढळलेल्या पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाची माहिती पाच दिवसांनी पालिकेला देण्यात आली आहे. या दिरंगाईमुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.