निसर्गाशी प्रत्येकाचे जिवाभावाचे नाते जुळलेले असते. निसर्गातील झाडे, फुले, फळे नेहमीच आपल्याला हवीहवीशी वाटत असतात. हा निसर्ग कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता आपल्याला भरभरून देत असतो. शहरात बोकाळलेल्या काँक्रीटच्या जंगलात हा बहरलेला निसर्ग मात्र अभावानेच आढळतो. ठाणे शहरातील अशा मोजक्या वसाहतींपैकी एक म्हणजे चितळसर-मानपाडा विभागातील गार्डन इस्टेट वसाहत. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या वसाहतीत सहज फेरफटका मारला तरी तनामनाचा सारा थकवा दूर होतो. मन ताजेतवाने होते.
ठाणे शहरापासून साधारण सहा ते सात किलोमीटर अंतरावर म्हणजे घोडबंदरच्या डावीकडे डोंगरपायथ्याशी गेल्या २० वर्षांत अनेक भव्य गृहसंकुले उभारली गेली आहेत. परिसर डोंगरपायथ्याशी आणि काही भाग वन विभागाच्या अखत्यारीत असल्याने निसर्गाशी या गृहसंकुलांची चांगली मैत्री जमली आहे. झाडाझुडपांचे, फळाफुलांचे अस्तित्व अबाधित ठेवून संकुले बांधण्यात आल्यामुळे शुद्ध हवेचा लाभ येथील रहिवाशांना मिळत आहे. चितळसर-मानपाडा, टिकुजिनीवाडी, पोखरण रोड क्र. २ येथील गार्डन इस्टेट हे निवासी संकुल त्यातीलच एक म्हणावे असे आहे.
गार्डन इस्टेट हे निवासी संकुल सुमारे १७ एकर जागेत उभारण्यात आले आहे. ही जागा पूर्वी आदिवासी शेतजमीन होती. झाडाफुलांनी बहरलेल्या या जागेत पूर्वी गोडाऊन्स, शेतजमीन, तर काही भाग पडीक होता. कालांतराने कायदेशीर प्रक्रियेनुसार बांधकाम व्यावसायिक रहेजा यांनी ती विकत घेऊन ती विकसित केली. जागेचा विकास करताना बांधकाम व्यावसायिकाने येथील हिरवाईला कोणताही तडा जाऊ दिला नाही, हे प्रत्यक्ष पाहिल्यावर लक्षात येते. या १७ एकर जागेत केवळ १३ इमारती बांधण्यात आल्या आहेत. त्यातील ८ इमारती या सातमजली, तर पाच इमारती या १० मजली आहेत. सफायर, रुबी आणि क्रिस्टल अशा एकूण ३ सोसायटींमध्ये या इमारती विभागल्या गेल्या आहेत. सोसायटीचे कामकाज चालविण्यासाठी प्रत्येकासाठी येथे कार्यालय आहे. या सोसायटींचा एक संयुक्त संघ स्थापन केला असून त्याचे संपूर्ण कामकाजावर लक्ष असते. १९९५ मध्ये पहिल्या आठ इमारती तयार झाल्या. त्याच वर्षांपासून रहिवासी इमारतींत राहण्यास येऊ लागले. १९९८ मध्ये इतर १० मजल्यांचे पाच टॉवर उभारण्यात आले. १३ इमारतींत एकूण ४०० सदनिका या वन, टू आणि थ्री बीएचकेमध्ये सामावल्या आहेत. काही बंगलेही येथे आहेत. १९९५ पूर्वी ही जागा पूर्णपणे झाडाझुडपांनी बहरलेली पण वस्तीविरहित होती. शेजारी कोकणीपाडा ही ग्रामवस्ती होती. ती अजूनही आहे. या मोकळ्या जागेवर नियोजनबद्धरीत्या हे गार्डन इस्टेट निवासी संकुल उभारण्यात आले आहे. या निवासी संकुलात सहा उद्याने आहेत. लहान मुलांसाठी असलेल्या वेगळ्या उद्यानात खेळण्याचे साहित्य ठेवण्यात आले आहे. उद्यानात ठिकठिकाणी आसनव्यवस्था म्हणून बाकडे तसेच कठडय़ांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह कुटुंबीय सदस्यांना एकत्रितरीत्या गप्पा मारता येतात. नारळ, अशोक, चिंच, आंबा, डाळिंब, सीताफळ, वड तसेच कांचन, चाफा यांसारखी विविध फुलझाडेही येथे आहेत.
या झाडाफुलांची सावली आणि थंड हवेचा गारवा भर दुपारी कडाक्याच्या उन्हातही येथे अनुभवता येतो, अशी माहिती रुबी सोसायटीचे सचिव कल्याण घोष यांनी सांगितले. पहाटेच्या सुमारास शुद्ध, ताज्या हवेचा आस्वाद प्रभातफेरीच्या माध्यमातून येथील रहिवाशी नेहमीच घेत असतात. त्यासाठी जॉगिंग ट्रॅकही बनविण्यात आले आहेत. पहाटेचे वातावरण खूपच आल्हादायक असते, असे येथील रहिवासी रुपा दवणे यांनी सांगितले. रहिवाशांचे नातेवाईक, मित्रमंडळी सुट्टीचा दिवस मजेत घालविण्यासाठी येथे नेहमी येत असतात. संकुलात राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशाला आपल्या खिडकीसमोर निसर्गरम्य विहंगम दृश्य पाहता येईल अशीच बांधकाम रचना केल्याने येथील रहिवाशी समाधानी आहेत. संकुलाचे कन्व्हेयन्स डीड झाले आहे.

वाहनतळाच्या जागेत कार्यक्रमांचा जल्लोश
संकुलात वाहनतळासाठी मोठय़ा प्रमाणात जागा देण्यात आली आहे. या वाहनतळाच्या जागेत वर्षभरात होणारे सण, उत्सव साजरे केले जातात. गणेशोत्सव ५ दिवसांचा असतो. त्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. नवरात्रोत्सवात दांडियाचा आवाज संकुलात घुमतो. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, होळी, दहीहंडी, दीपोत्सव आदी सण, उत्सवांसह क्रीडा दिनही साजरा करण्यात येतो. क्रीडा दिनात, क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ आदी खेळांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे हळदीकुंकू, कुकिंग शो आदी कार्यक्रमही होतात. डिसेंबरला स्नेहसंमेलनाचा जल्लोश असतो. येथे विविध भाषिक समाज, धर्माचे लोक राहत असल्यामुळे त्या त्या धर्माचे, समाजाचे उत्सव, सणही साजरे होत असतात. त्यामध्ये सर्व रहिवाशांचा सहभाग असतो. सुरक्षारक्षक, घरकामगार, सफाई कर्मचारी, दुरुस्ती सेवा कर्मचारी यांनाही कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणूक देऊन त्यांनाही या कार्यक्रमांत सामील करून घेतले जाते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध संकुलांतील आबालवृद्धांच्या कलेला वाव देण्यात येतो. त्याचप्रमाणे स्थानिकांमधील व्यावसायिकतेच्या कलेलाही प्रोत्साहन मिळावे यासाठी संकुलात रहिवाशांनी केलेले खाद्यपदार्थ, वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांचा मेळा येथे दरवर्षी भरत असतो. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन संपूर्णपणे महिला करीत असतात, अशी माहिती येथील रहिवाशी वैशाली पळशीकर यांनी दिली.

सुरक्षेसाठी सर्व काही..
रात्रीचा अंधार दिव्यांच्या प्रकाशात गडप होत असल्यामुळे येथे रात्री उशिरापर्यंत रहदारी असते. तसेच सुशिक्षित आणि उच्चभ्रू लोकवस्ती असल्यामुळे चोरी, मारामारी, इतर अनुचित प्रकार येथे सहसा होत नाहीत. असे असतानाही खबरदारी म्हणून संकुलात प्रत्येक इमारतीला सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक तैनात आहेत. त्याचप्रमाणे पेस्ट कंट्रोल वेळोवेळी केले जाते. इमारतीच्या सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणाही येथे कार्यरत आहे. त्याची वेळोवेळी चाचणी येथे केली जाते. संकुलात रहिवाशांसाठी बायोमेट्रिक्स यंत्रणा तसेच पाण्याची टाकी पूर्णपणे भरल्याचे संकेत देणारी आवाजाची सिग्नल यंत्रणाही येथे बसविण्यात आली आहे. येणारा प्रत्येक नागरिक मग तो सफाई कर्मचारी असो, प्लंबर असो वा घरकाम करणारी महिला असो, त्यांची न चुकता वहीत नोंदणी केली जाते. पाणी, वीज, ड्रेनेज वा इतर समस्या असो, त्यावर उपाय करणारी यंत्रणा दूरध्वनी करताच येथे हजर होते. त्याचप्रमाणे अंतर्गत दूरध्वनी सुविधाही येथे आहे. त्याद्वारे सूचना, निरोप, मदत देता व घेता येते. संकुलाला तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यावर २४ तास सुरक्षारक्षक तैनात असतो. प्रत्येक इमारतीला लिफ्ट असल्यामुळे पॉवर बॅकअपही ठेवण्यात आले आहे.

सुविधा आणि नियोजित प्रकल्प
संकुलास मुबलक पाणीपुरवठा आहे. बोअरवेलच्या पाण्याचाही वापर केला जातो. आणीबाणीच्या प्रसंगी हे बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य असल्याने ते पिण्यासाठी वापरले जाते. कचऱ्याचे सुका आणि ओला असे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी सोसायटीने प्रत्येक सदनिकाधारकास दोन डबे दिले आहेत. ओला आणि सुका कचरा घेऊन जाण्यासाठी महापालिकेची घंटागाडी येत असते. या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प विचाराधीन असून तो लवकरच राबविण्यात येणार आहे, असे कल्याण घोष यांनी सांगितले. पावसाचे पाणी संकलित करण्यासाठी पर्जन्य जलसंधारण यंत्रणाही बसविण्यात आली आहे. हे पाणी वर्षभर येथील झाडांसाठी वापरले जाते. वीज आणि पाण्याचा योग्य वापर होण्यासाठी वेळोवेळी प्रबोधन केले जाते. भविष्यात सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. संकुलातील विजेसाठी एलईडीचे दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे विजेची बचत झाली आहे. संकुलाच्या समोरच डी मार्ट असल्याने बाजारहाटसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता वाटत नाही. हॉटेल, रुग्णालये, शाळा, दवाखाने, आलिशान दुकाने, टपाल कार्यालय संकुलापासून एक-दीड किलोमीटरवर आहेत, तर करमणुकीचे साधन म्हणून डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, टिकुजिनीवाडी, सूरज वॉटर पार्कला जाता येते. ठाणे, मुंबईला जाण्यासाठी टीएमटी, बेस्ट, रिक्षा आदी वाहनांची सुविधा आहे; परंतु ठाणे स्थानकाकडे जाणारी टिकुजिनीवाडी ही एकमेव बससेवा असून तिच्या फेऱ्या मात्र कमी आहेत. त्या वाढवाव्यात, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.
गार्डन इस्टेट, टिकुजिनीवाडी, चितळसर-मानपाडा, पोखरण रोड नं. २, ठाणे (प)
suhas[dot]dhuri[at]expressindia[dot]com