संरक्षक कठडा, रस्त्याला तडा गेल्याचे उघड; मार्गिकेचे उद्घाटन लांबणीवर

ठाणे : मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या नवीन कोपरी पुलाच्या उद्घाटनाआधीच त्यावरील रस्त्याला तसेच संरक्षण कठडा आणि रस्त्याखालील विटांना मोठे तडे गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मार्गावर पडलेल्या तडय़ाची तपासणी मुंबई आयआयटीमार्फत केली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बुधवारी या तपासणीसंबंधीची माहिती दिली. या घडामोडींमुळे कोपरी पुलाच्या नव्या माíगकेचे उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

ठाणे आणि मुंबईच्या वेशीवरील कोपरी पूल अरुंद असल्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागून कोंडी होते. ही समस्या सोडविण्यासाठी काही वर्षांपूर्वी एमएमआरडीएने कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूला एमएमआरडीएने नव्या पुलाची उभारणी केली आहे. या पुलाचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने येत्या काही दिवसांत त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्याआधीच या पुलावरील सिमेंटच्या रस्त्याला, संरक्षण कठडा आणि पुलाखाली असलेल्या सिमेंटच्या विटांना मोठे तडे गेल्याचा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मंगळवारी उघडकीस आणला होता. या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या प्रकाराची तातडीने दखल घेत मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी बुधवारी पुलाच्या कामाची पाहणी केली. रस्त्याला पडलेले तडे तसेच इतर तक्रारींची तपासणी मुंबई आयआयटीच्या तज्ज्ञांमार्फत केली जाईल, अशी माहिती महानगर प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या तज्ज्ञांचा अहवाल आल्यानंतर पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे की नाही हे समोर येणार आहे. तोपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

कोपरी उड्डाणपुलाचे काम वेगाने व्हावे यासाठी ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेचे नेते कमालीचे आग्रही आहेत. पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्याकडे नगरविकास खाते तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचा कार्यभार आहे. या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत रस्त्याला, कठडय़ाला गेलेल्या तडय़ांची चित्रफीत मनसेने मंगळवारी प्रसिद्ध केल्याने सत्ताधारी शिवसेनेचे नेतेही सावध झाले आहेत.

नव्याने उभारण्यात येत असलेल्या कोपरी पुलाच्या पृष्ठभागाला तडे गेल्याचे तसेच संरक्षक कठडय़ालाही तडे गेल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिल्यानंतर या पुलाच्या  तपासणीचा निर्णय घेण्यात आला आहे.