भविष्यात पाण्यासाठी होणारी जलयुद्धे टाळण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार योजनेचे पाऊल उचलले असून या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त थानेजीळे येथून शासनाने काढलेल्या जलदिंडीचा समारोप तालुक्यातील काराव (धारोळ वाडी) येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना दीपक कुटे यांनी वरील आवाहन केले. यावेळी गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के, नायब तहसीलदार माधुरी डोंगरे, सरपंच काथोड कडव व अन्य मान्यवर उपस्थित होते. माणसाला अन्नाची खरी आवश्यकता असून हे अन्न, माती व पाण्याशिवाय अशक्य आहे. म्हणूनच माती आणि पाण्याला सोन्यापेक्षाही अधिक मूल्य येण्याची शक्यता आहे. असे असताना आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, असे कुटे यांनी स्पष्ट केले. भविष्यात चौथे महायुद्ध झालेच तर ते पाण्यावरून होईल, असे आपण अनेक वर्षे ऐकतो आहोत. तरीही पाणी बचतीसाठी ठोस असे उपाय योजण्यात आपण कुठेतरी कमी पडतो आहोत. पाण्याचा संचय करण्यासाठी राज्य सरकारने काही योजना आखल्या असल्या तरी प्रत्येक रहिवाशाने त्यासाठी प्रयत्नशील असायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने आखलेली जलयुक्त शिवार ही संकल्पना पाणी बचतीचा अभिनव प्रयोग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंबरनाथ तालुका हा अत्यंत कोरडवाहू जमिनींचा असल्याने तेथे जलयुक्त शिवार योजना राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे कारावचे ग्रामस्थ हे भाग्यवान आहेत की शासनाने या तालुक्यातून केवळ याच गावाची निवड केलेली आहे. या तालुक्यात जेमतेम दीड टक्का जमीन ही सिंचनाखाली असून ९८ टक्के जमीन ही कोरडवाहू आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी संघटित होऊन या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या स्थापन झालेल्या कारावामधील दहा गटांना शासनाच्या कृषी विभागतर्फे प्रत्येकी दहा हजार या प्रमाणे मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.