ठाणे : राबोडी येथील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले. त्यानंतर आव्हाड यांनी आता ‘ये तो बस अंगडाई है, और लडाई बाकी है’ असे म्हणाले आहे.
राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ते राबोडी परिसरातून दुचाकीवर जात असताना, त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते फरार झाले होते. जखमी अवस्थेत जमील शेख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. दरम्यान, जमील शेख हत्याकांडाचा फेर तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हा विषय आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात मांडला होता. त्यामुळेच फेर तपास प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याबद्दल जमील शेख यांच्या मुली जोबिया आणि जायरा यांनी आव्हाड यांची निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले.
जितेंद्र आव्हाड हे आमच्यासाठी लढत असल्यानेच न्याय दृष्टीपथात आला आहे, असे या मुलींनी सांगितले. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ऋणनिर्देश व्यक्त केले. आव्हाड यांच्याकडेच त्यांनी हे पत्र सोपविले असून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे आभारपत्र द्यावे, अशी विनंती केली आहे. जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतल्यानंतर जोबिया आणि जायरा यांनी सांगितले की, आव्हाड यांनी विधानसभेत आम्हाला न्याय देण्यासाठी संघर्ष केला. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणात जमील शेख यांच्या हत्येचा फेरतपास करण्याची घोषणा केली. तसेच, शेख कुटुंबाला न्याय देण्यास आपण बांधील असून योग्य तपास करून फडणवीस यांनी न्याय देऊ, असे भाष्य केले. त्याबद्दल आम्ही बहिणी आणि आमची आई त्यांचे आणि विषय पटलावर आणणारे जितेंद्र आव्हाड यांचे मनापासून आभार मानतो. आम्हाला लढण्याची प्रेरणा वैभवी संतोष देशमुख हिच्याकडून मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आमचा आक्रोश पाहून फेरतपासाचा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.
असे नमूद करून त्या म्हणाल्या की, नव्याने होणारी ही चौकशी आणि तपास हा चांगल्या अधिकाऱ्यांच्या हाती द्यावा, जेणेकरून ते कोणत्याही अमीषाला आणि कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कारण पैसा आणि राजकीय दबाव हे बरेच काही करून जात असतात. आता ज्यांच्याकडे तपासकाम होता, त्या दिलीप पाटील यांनी करोडो रूपये उकळलले आहेत. त्यांनी तपास भरकटवला आहे. तपासाधिकारी दिलीप पाटील अनेक पुराव्यांना बगल देऊन आरोपपत्रामध्ये आरोपींना साह्यभूत ठरणाऱ्या गोष्टी करून ठेवल्या आहेत, असेही वकील सांगत आहेत. पण, आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यामुळे न्याय करीत असताना योग्य त्या अधिकाऱ्यांच्या हाती तपासाची सूत्रे द्याल, याबद्दल आम्हाला खात्री आहे, असे म्हटले.
शेख कुटुंबीयांचा लढा विधिमंडळात लढल्याबद्दल जरा आणि जोबीया यांनी आव्हाड यांना पुष्पगुच्छ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ये तो बस अंगडाई है, और लडाई बाकी है, असे म्हणत पुष्पगुच्छ कसले देताय, आपल्याला अजून खूप लढायचे आहे, असे आव्हाड म्हणाले. ते म्हणाले की, जमील शेख हत्याकांडाचे प्रकरण खुले आहे. पण, मी १०० टक्के सांगतो की हा तपास पोलिसांनी योग्यरित्या केलाच नाही. २०१४ मध्ये जमीलवर हल्ला झाला होता. त्यावेळी त्यानेच हल्ल्यामागे “आका” आहे, असे सांगितले होते. पण तेव्हाही कारवाई करण्यात आली नव्हती. खून होऊन पाच वर्षे झाली आहेत. पण, मुख्य आकाला अटक करण्यात आलेली नाही. मारेकरी इरफानने आकाचे नाव घेतले होते. ओसामानेही आकाचे नाव घेतले. ओसामाने ज्या बैदनाथ आणि देवेंद्र यांना पहिली सुपारी दिली होती. त्यांनीही आकाचे नाव घेतले आहे. शिवाय, ओसामाचे चित्रीकरण देखील आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे आमचे वैचारिक विरोधी आहेत. पण, तेच न्याय देतील, याचा मलाही विश्वास होता. या प्रकरणात तत्कालीन पोलीस अधिकारी नितीन ठाकरे यांनी चांगला तपास केला होता. पण, त्यांची बदली केली, बदलीचा मोबाईल स्टेटस आकाने ठेवला. जो कोणी योग्य तपास करेल, त्याची बदली केली जाईल, या धमकीसाठीच तो स्टेट्स होता. परिणामी, कोणाचीही चौकशी करण्याची हिमंत झाली नाही. आता आशा फक्त फडणवीस यांच्यावरच आहे. कारण त्यांनी मुलींच्या आक्रोशाचा उल्लेख केला आहे. त्यातून त्यांच्यातील पित्याची कळकळ दिसली आहे. तरीही, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तपास एकाच्या हाती नको, तीन जणांची टीम असावी, असेही आव्हाड म्हणाले.