कळव्यावर विकास हस्तांतर हक्क, रस्ते प्रकल्पांची बरसात; आयुक्तांवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीचे अकस्मात मनपरिवर्तन
कळवा खाडीकिनारी चौपाटी असो की ठाणे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाई असो, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर आगपाखड करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आता जयस्वाल यांचे कौतुक करू लागल्याने राजकीय वर्तुळातील भुवया उंचावल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जुळवून घेत ठाणे महापालिकेत कोटय़वधी रुपयांच्या कंत्राटी कामांच्या निविदांचा धडाका लावणाऱ्या जयस्वाल यांनी आव्हाड यांना ‘खूश’ करण्याचा चंग बांधला आहे. कळवा-मुंब्रा परिसरात कोटय़वधी रुपयांच्या रस्ते बांधणीस प्रशासनाने नुकताच हिरवा कंदील दाखविल्याने वर्षभरापासून सुरू असलेल्या आव्हाड-जयस्वाल यांच्यातील ‘संघर्षां’ची धार बोथट करण्यात अभियांत्रिकी विभागाला यश मिळाल्याची चर्चा आहे.
कळवा चौपाटीच्या वादग्रस्त कंत्राटावरून आव्हाड आणि जयस्वाल यांच्यात टोकाचे मतभेद पाहायला मिळत होते. हे कंत्राट ठरावीक ठेकेदारास मिळावे यासाठी अभियांत्रिकी विभाग प्रयत्नशील असल्याची टिकाही आव्हाड यांनी केली होती. त्यानंतर मुळ ठेका रद्द करत जयस्वाल यांनी कळवा चौपाटी कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली. हे करत असताना मुंब्रा येथील मित्तल कम्पाऊंड परिसरातील एका रस्त्याचे काम करण्यासाठी बडय़ा बिल्डरला कोटय़वधी रुपयांचे बांधकाम विकास हस्तांतर हक्क (कन्स्ट्रक्शन टीडीआर) बहाल करण्यात आले. महापालिकेने आखलेल्या रकमेपेक्षा रस्त्याच्या कामाचा टीडीआर अधिक रकमेचा असल्याची चर्चा आहे. या घडामोडींनंतर कळवा चौपाटीविरोधाचा सूर एकाएकी मवाळ होऊ लागला असून याच रस्त्याच्या कामाच्या शुभारंभानिमित्त आव्हाड यांनी जयस्वाल यांचे मुंब्य्रात जागोजागी फलक लावल्याने या दोहोंतील मनोमीलनाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, आव्हाड यांनी कळव्याच्या विकासासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आयुक्त जयस्वाल यांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर कळवा चौपाटीची संकल्पना २००९मध्ये आपणच मांडल्याचाही दावा केला. या चौपाटीला पूर्णत्वास नेत असल्याबद्दल जयस्वाल यांचे आभार मानतानाच या कामांचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते व्यस्त असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी हेदेखील प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.
संघर्ष ते समन्वय
- ठाणे महापालिका आयुक्त म्हणून संजीव जयस्वाल यांच्या कामाचा सर्वत्र गवगवा होत असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अगदी सुरुवातीपासून आयुक्तांना िखडीत गाठण्याची एकही संधी सोडलेली नाही.
- जयस्वाल यांनी रस्ते रुंदीकरण मोहीम राबविताना केलेले तोडकाम तसेच स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना केलेली मारहाण याविरोधात राष्ट्रवादीने उघड पवित्रा घेतला होता.
- महापालिकेतील शेकडो कोटी रुपयांचे प्रस्ताव चर्चेविना मंजूर केले जात असल्याने त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही मध्यंतरी आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी दिला होता.
- गेल्या महिनाभरापासून मात्र आव्हाड आणि राष्ट्रवादीला खूश करण्याकडे प्रशासनाचा कल दिसू लागला असून शहरातील रस्ते बांधणीसाठी आखण्यात आलेल्या सुमारे ५०० कोटी रुपयांच्या कंत्राटांमध्ये कळवा-मुंब््रयाला झुकते माप दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मान्यतेसाठी सादर केलेल्या चुकीच्या प्रस्तावांविरोधात आम्ही नेहमीच विरोधी भूमिका बजावली आहे. आम्ही कधीच विरोधासाठी विरोध केला नाही. ठाणे शहराच्या तुलनेत कळवा आणि मुंब्रा भागातून राष्ट्रवादी पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून आल्यामुळे येथील नागरी समस्या सोडविण्याकडे आमचे विशेष लक्ष असते. मात्र, राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या प्रभागांतील नागरी कामांसाठी प्रशासनाने चांगला निधी उपलब्ध करून दिला आहे.
– मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते, ठामपा.
ठाणे पालिका क्षेत्रातील मागासलेला भाग म्हणून ओळख असलेल्या मुंब्रा व कळवा परिसरातील १०० टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार आहे. हे जयस्वाल यांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले. मुंब्रा येथील पाण्याची समस्या सोडवण्यासाठीही त्यांनी सहकार्य दिले आहे.
– जितेंद्र आव्हाड, आमदार, कळवा-मुंब्रा