ठाणे : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात संताप व्यक्त होऊ लागला आहे. यावरून टिका होऊ लागताच मंत्री कोकाटे यांनी प्रतिक्रीया देत आपण सभागृहात गेम खेळत नव्हतो, असे स्पष्टीकरण दिले आहे. मंत्री कोकाटे यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री कोकाटे यांचा विधीमंडळ सभागृहात मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा नवा व्हिडिओ समाजमाध्यांवर शेअर करत आणखी किती पुरावे हवे, अशी विचारणा केली आहे.
राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच संपले. या अधिवेशनात राज्याचे कृषीमंत्री सभागृहातच मोबाइलवर रमी गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला होता. यानंतर राज्यात संताप व्यक्त होऊ लागला असून यातूनच रविवारी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कोकाटे यांच्याविरोधात निवेदन देत पत्ते फेकले होते. तसेच विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया देत आपण सभागृहात गेम खेळत नव्हतो, असे स्पष्टीकरण दिले.
माणिकराव कोकाटे काय म्हणाले.
मी विधानपरिषदेत कामकाजासाठी बसलो होतो. तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे. म्हणून मी खालच्या सभागृहात (विधानसभेत) काय कामकाज सुरू आहे, हे पाहण्यासाठी मोाबाइलवरून युट्यूबवर गेलो होतो. युट्यूबवर व्हिडीओ सुरू केल्यानंतर जाहिराती येत असतात. त्याप्रमाणेच त्यावेळी रम्मी गेमची जाहिरात आपोआप प्ले झाली. मी जाहिरात स्किप करून पुढे गेलो. पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी फक्त १८ सेकंदाचाच व्हिडीओ दाखवला, असा दावा माणिकराव कोकाटे यांनी केला होता.
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला नवा व्हिडीओ
एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे, प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे आणि दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते, जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा…कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी कोकाटे यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय, अशी टिकाही त्यांनी केला आहे.