|| नीलेश पानमंद

जितेंद्र आव्हाड पुन्हा बाजी मारणार?; शिवसेनेला उमेदवारच मिळेना:- ठाणे जिल्ह्य़ात काही वर्षांपूर्वी शिवसेनेच्या तोडीस तोड ताकद उभी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपच्या लाटेत मात्र अक्षरश: शकले झाली आहेत. नवी मुंबईतून गणेश नाईक, जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातून कपिल पाटील, किसन कथोरे यांनी भाजपची साथ धरल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे कट्टरपंथीय जितेंद्र आव्हाड हाच काय तो आता पक्षाचा जिल्ह्य़ातील चेहरा आहे. त्यामुळे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील लढत राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची असून शिवसेनेत मात्र येथून कोणाला उमेदवारी द्यायची यावरून सुरू असलेला घोळ अजूनही मिटलेला नाही.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे दोन वेळा निवडून आले आहेत. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत कळवा-मुंब्रा विभागातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक २७ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. लोकसभा निवडणुकीत या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीला जेमतेम दहा हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे येथून आव्हाडांना यंदा आव्हान उभे केले जाऊ शकते, असे चित्र सुरुवातीच्या काळात उभे केले गेले खरे, मात्र नेहमीप्रमाणे शिवसेनेने उमेदवारीवरून येथे घोळ घातल्याने हा घोळ आव्हाडांच्या पथ्यावर पडला आहे. कळवा परिसरात आगरी-कोळी, तर मुंब्रा परिसरात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी आहे. या दोन्ही भागांतून महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात. राज्यात भाजप आणि शिवसेनेचे वारे वाहत असतानाही अडीच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने कळवा-मुंब्य्राचा गड राखला होता. महापालिकेत राष्ट्रवादीचे एकूण ३४ नगरसेवक निवडून आले असून त्यापैकी २७ नगरसेवक कळवा-मुंब्रा विभागातील आहेत. २७ पैकी ९ नगरसेवक कळव्यातून, तर १८ नगरसेवक मुंब्य्रातून निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे या मतदारसंघातून दोनदा विजयी झाले आहेत. यंदाही त्यांनाच या मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आव्हाड हे विजयाची हॅट्ट्रिक करणार की नाही, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

दहा वर्षांपूर्वी कळवा-मुंब्रा परिसरातील रस्त्यांची अवस्था वाईट होती आणि अनेक ठिकाणी अरुंद रस्ते होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या होती. मात्र, गेल्या दहा वर्षांत रस्ते रुंदीकरण तसेच सिमेंट-काँक्रीटचे रस्ते तयार केले. कळव्यातील गुणात्मक कामांमुळे येथे रिअल इस्टेटचे महत्त्व वाढले. काही अधिकाऱ्यांमुळे पाण्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नाही. तसेच धरणाची उभारणी झाल्याशिवाय पाणीसमस्या सुटणार नाही. याशिवाय पारसिक चौपाटी, तिसरा खाडी पूल, पोलीस ठाणे, मुंब्रा रुग्णालय, स्मशानभूमी, कब्रस्तान अशी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांची कामे करण्याचा प्रयत्न केला आहे. – जितेंद्र आव्हाड, आमदार, कळवा-मुंब्रा मतदारसंघ

मतदार म्हणतात,

शहरातील इतर आमदारांच्या तुलनेत येथील आमदार जितेंद्र आव्हाड यांची विकासकामे समाधानकारक आहेत. मात्र, कळवा-मुंब्रा भागात मुलांना खेळण्यासाठी मोठय़ा मैदानाची आणि बागांची गरज आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी या भागात एखादे विरंगुळा केंद्र असायला हवे. – गजानन चव्हाण, वकील

याआधीच्या आमदारांपेक्षा गेल्या दहा वर्षांत मुंब्रा भागात चांगली विकासकामे झाली आहेत. तरी मुंब्रा भागात आजही मोठय़ा प्रमाणात समस्या आहेत. मुंब्रा येथे सरकारी रुग्णालय नसल्याने गरीब रुग्णांना कळव्यातील रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे आमदारांनी या समस्येकडे लक्ष द्यायला हवे. – सैफ आसरे, जागरूक नागरिक

मतदारसंघातील समस्या..

  •  कळवा आणि मुंब्रा शहराच्या प्रवेशद्वारावरील वाहतूक कोंडी
  •  तिसऱ्या खाडीपुलाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे विटावा भागात होणारी कोंडी
  •  पुरेशी मैदाने आणि उद्याने नाहीत
  •  लोकसंख्येच्या मानाने पुरेसा पाणीपुरवठा होत नाही

शिवसेनेची उमेदवारी कुणाला?

कळवा-मुंब्रा परिसरात राष्ट्रवादीची मोठी ताकद असली तरी लोकसभा निवडणुकीमध्ये युतीची ताकद वाढल्याचे दिसून आले. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र येते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कळवा-मुंब्य्रातून ६७,४५५ तर राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना ७७,३३६ इतकी मते मिळाली होती. कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादीची ताकद लक्षात घेता बाबाजी यांना अपेक्षित मते मिळाली नव्हती. केवळ दहा हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे या मतदारसंघात युतीची ताकद वाढत असल्याचे चित्र आहे. युतीच्या जागावाटपामध्ये ही जागा मिळावी यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, ही जागा शिवसेनेला मिळाली आहे. शिवसेनेने अजूनही उमेदवार जाहीर केलेला नसून नगरसेवक राजेंद्र साप्ते, माजी नगरसेवक सुधीर भगत यांची नावे चर्चेत आहेत.