ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे माजी नगरसेवक आणि जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक अमित सरैय्या यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज, गुरुवारी दुपारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
सरैय्या यांच्यासोबत अनेक स्थानिक कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सरैय्या यांना पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात भाजप नवी खेळी खेळली असून या पक्ष प्रवेशामुळे वागळे इस्टेट परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
ठाणे महापालिका निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या कळव्यातील समर्थक नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. यात काहीजण जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक होते. त्यापाठोपाठ आव्हाड यांचे आणखी कट्टर समर्थक आता त्यांची साथ सोडणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरैय्या यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सरैय्या यांच्या भाजप प्रवेशामुळे जितेंद्र आव्हाड यांना आणखी धक्का बसला आहे. सरैय्या हे आज, गुरुवारी दुपारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
राजकीय प्रवास आणि पार्श्वभूमी
अमित सरैय्या यांनी २०१२ साली सावरकरनगर प्रभागातून निवडणूक लढवत शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी त्या भागात स्वतःचा प्रभाव निर्माण केला होता. मात्र, २०१७ च्या महापालिका निवडणुकीत बारटक्के यांनी पुनरागमन करत सरैय्या यांना पराभवाची चव चाखवली होती. तरीही सरैय्या हे या भागातील सक्रिय आणि प्रभावी राजकीय नेते म्हणून ओळखले जातात.
शिवसैनिकांकडून धक्काबुक्की, भाजपकडे झुकाव
दिवंगत भाजप नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने बनावट फेसबुक खात्यावरून शिंदे गटातील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांवर सातत्याने टीका केली जात होती. या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर चंद्रेश यादव या तरुणाला अटक करण्यात आली. त्यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक पोलीस ठाण्यात उपस्थित होते. याच दरम्यान, अमित सरैय्या पोलीस ठाण्यात पोहोचले आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. या मागणीमुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी सरैय्या यांना धक्काबुक्की केली होती. या प्रकारानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. यातूनच कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला होता. अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
वागळेत भाजपची ताकद वाढण्याची शक्यता
वागळे इस्टेट हा परिसर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच भागातील सावरकरनगर मधून यापूर्वी सरैय्या निवडून आले होते. या भागातील सक्रिय आणि प्रभावी राजकीय नेते म्हणून सरैय्या हे ओळखले जातात. त्यामुळे ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सरैय्या यांच्या प्रवेशामुळे वागळेत भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
म्हणून भाजप प्रवेश
“कार्यकर्त्यांचा आग्रह आणि प्रभागाच्या विकासासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी प्रतिक्रिया सरैय्या यांनी दिली.