शासनाकडून विशेष मुलांसाठी योजना जाहीर केल्या जातात. मात्र त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नहीत. अशावेळी लोक सहभागातून उभ्या राहिलेल्या घरकुलसारख्या संस्था सातत्यपूर्ण काम करतात. अशा संस्थांची देशाला गरज आहे, असे गौरवोद्गार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी काढले. अमेय पालक संघटनेच्या अंबरनाथ तालुक्यातील खोणी येथील घरकुल या विशेष मुलांच्या निवासी आश्रमाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात न्यायमूर्ती ओक उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.

हेही वाचा >>>कल्याण मधील चिकणघरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

विशेष मुलांच्या संगोपणासाठी लोकसहभागातून उभारण्यात आलेली अमेय पालक संघटनेची घरकुल हे निवासी आश्रम आपला रौप्य महोत्सव साजरा करत आहे. त्यानिमित्त अंबरनाथ तालुक्यातील काटई कर्जत राज्यमार्गावर असलेल्या खोणी गावातील या आश्रमात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अभय ओक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, डॉ. हिम्मतराव बावस्कर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ, उदय निरगुडकर, डॉ. विनोद इंगळहळ्ळीकर, विद्या निकेतन शाळेचे विवेक पंडित, विद्यार्थी विकास योजनेचे रविंद्र कर्वे, निवृत्त उप जिल्हाधिकारी भरत शितोळे, सुरेंद्र दिघे अशा अनेक सन्माननीय व्यक्तींनी हजेरी लावली होती. याप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती अभय ओक यांनी घरकुलचे कौतुक केले. लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या प्रकल्पांपैकी घरकुल हे आदर्श उदाहरण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक कामे फक्त शासनानेच करायची हा गैरसमज झाला. पण त्याला छेद देण्याचे काम अमेय पालक संघटनेने केल्याचे सांगत त्यांनी संस्थेचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीही संस्थेचा शब्दांनी गौरव केला. समाजाला अधिक सुंदर करण्यासाठी लोक एकत्र आली की असे प्रकल्प उभे राहतात असे गौरवोद्गारही डॉ. काकोडकर यांनी काढले. तर समाजाचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी अशा संस्था महत्वाच्या आहेत असे मत डॉ. अविनाश तुपे यांनी यावेळी व्यक्त केले. ‘घरकुल’च्या २५ वर्षांचा आढावा घेणाऱ्या ‘काडी काडी जमवताना’ या विशेष पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘ग्रंथाली’चे दिनकर गांगल यांच्या मार्गदर्शनाखाली या पुस्तकाचे संपादन करण्यात आले आहे. संस्थेचे अविनाश बर्वे आणि नंदिनी बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.