मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत १,३५५ बाल गुन्ह्यांची प्रकरणे, कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेचा गैरफायदा घेऊन दिशाभूल

निखिल अहिरे

ठाणे : करोना महासाथीमध्ये झालेली आर्थिक आणि मानसिक कोंडी त्यामुळे किशोरवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याची भीती व्यक्त होत आहे. जिल्हा बाल संरक्षण विभागाने केलेल्या एका सर्वेक्षणात मागील दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल १,३५५ बाल गुन्हेगारांची नोंद करण्यात आली आहे.

चोरी, मारहाण याबरोबरच बलात्कार, खून आणि लैंगिक शोषण यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्येही १८ वर्षांंपेक्षा कमी वयोगटाच्या मुलांचा समावेश दिसून आला आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या मुलांना फूस लावून त्यांच्याकडून चोरी, मारहाण यासारखे प्रकार घडवून आणले जात असल्याचे निरीक्षण जिल्हा बाल संरक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या पाहणीतून पुढे आले आहे.

करोनाकाळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या, तसेच कुटुंबातील कर्त्यां व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आर्थिक संकट अधिकच गहिरे झाले. माणसे गमावली त्यात आर्थिक संकटात सापडल्याने अनेकांना नैराश्याने ग्रासले. अशा स्थितीत आर्थिक दृष्टय़ा दुर्बल असलेल्या अल्पवयीन मुलांना समाजातील काही विकृत घटकांकडून लक्ष्य करण्यात आले. काही बालकांशी केलेल्या संवादानंतर बाल संरक्षण विभागाने हे निरीक्षण नोंदवले आहे.

समाजमाध्यमांचाही प्रतिकूल परिणाम

मागील काही महिन्यांपासून ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू असल्याने अनेक विद्यार्थी मोबाइलच्या आहारी गेल्याचे आता लक्षात येत आहे. मागील दीड वर्षांच्या कालावधीत (मार्च २०२० ते नोव्हेंबर २०२१) ज्या १,३५५ अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, यापैकी बहुतांश मुले हे समाजमाध्यमांच्या पूर्णपणे आहारी गेल्याचे आढळून आले आहे. समाजमाध्यमांचा गैरवापर करून  मित्र-मैत्रिणींचा लैंगिक छळ करण्याचा प्रकारही या काळात वाढीस लागले आहेत.

बाल न्याय मंडळातील प्रकरणे

  • बाल न्याय मंडळात २०१८ मध्ये बाल गुन्हेगारांची ९७१ प्रकरणे तर २०१९ मध्ये १,१४६  प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.  
  • मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत ४८ मुलांविरोधात खून आणि मानवी तस्करीचे गुन्हे नोंदविण्यात आले.  जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत ८१ खुनाची प्रकरणे बाल न्याय मंडळासमोर आली. २०२० मध्ये चोरीची १७१ तर २०२१ मध्ये ३३६ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. तसेच जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या वर्षी २७३ तर यावर्षी ४४६ मारामारीची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.

धोकादायक वळण  

अल्पवयीन मुलांना शिक्षा होत नाही किंवा फार कामी शिक्षा होते असे त्या लहान मुलांना सांगून त्यांच्याकडून चोरी, मारामारी इतकेच नव्हे तर खुनासारखे प्रकारही घडवून आणले जात असल्याचे या पाहणीत दिसून आले आहे. समुपदेशनाच्या प्रक्रियेत या मुलांशी संवाद साधताना ही धक्कादायक तथ्ये पुढे येत आहेत, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रामकृष्णन रेड्डी यांनी दिली. करोनाकाळानंतरची आर्थिक चणचण हे अशा गुन्ह्यांमागील प्रमुख कारणे असल्याचे या संवादातून पुढे येत आहे, असेही रेड्डी म्हणाले. करोनाकाळात बालसुधारगृहात पाठविण्यात आलेल्या १,३५५ मुलांपैकी अनेक जणांची पुढे जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

करोनाकाळात अनेक अल्पवयीन मुलांच्या अडचणीचा फायदा घेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याचे दिसून आले आहे. टाळेबंदीनंतरच्या काळात हे प्रमाण अधिक आहे. अनेक अल्पवयीन मुले उदरनिर्वाहासाठी वाईट संगतीत गेली असल्याचे जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. ७ ते १८ वयोगटातील मुलांचा यात अधिक समावेश आहे. या मुलांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा बाल संरक्षण विभागातर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामकृष्ण रेड्डी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, ठाणे</strong>