कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक विस्कळीत
कल्याण : मध्य रेल्वेच्या मार्गावरील खडवली ते टिटवाळा स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी रेल्वे रुळाला तडा गेल्याने कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ऐन सकाळच्या वेळेत अर्धा तास वाहतूक ठप्प होऊन शहाड, आंबिवली, टिटवाळा स्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीचा भार वाढला. या गर्दीमुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाचे हाल झाले तर काहींना कामावर पोहोचण्यास उशीर झाला.
मध्य रेल्वेच्या मार्गावरील खडवली ते टिटवाळा स्थानकादरम्यान रेल्वेचे कर्मचारी रुळाची तपासणी करीत होते. त्यावेळेस रुळाला तडा गेल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या मार्गावरील लोकल गाडय़ांची वाहतूक थांबविण्यात आली. तसेच तातडीने रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या कामामुळे अर्धा तास लोकल गाडय़ांची वाहतूक ठप्प होती. मुंबईमध्ये कामानिमित्त अनेक नागरिक दररोज कल्याण ते कसारा मार्गावरून प्रवास करतात.
वेळापत्रक कोलमडले
या मार्गावरील वाहतूक ऐन सकाळच्या वेळेत ठप्प झाल्याने कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाचे हाल झाले. शहाड, आंबिवली, टिटवाळा या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अखेर अर्धा तासानंतर रुळाची दुरुस्ती करून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. असे असले तरी दहा ते पंधरा मिनिटे उशिराने लोकल गाडय़ांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे अनेकांना कामावर जाण्यास उशीर झाला.