पश्चिम कल्याणमध्ये मंगळवारी झालेल्या सिलिंडर स्फोट दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या आणखी एका महिलेचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. शबाना सलीम सय्यद शेख (३५) या स्फोटात गंभीररीत्या भाजल्या होत्या. शेख यांच्या मृत्युमुळे सिलेंडर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोन झाली.

कल्याण पश्चिमेतील रमाबाई आंबेडकरनगरमधील चाळीत मंगळवारी सकाळी सिलेंडरचा स्फोट झाला होता. सिलिंडरमधून रात्रभर गॅसगळती झाल्यानंतर सकाळी शेख यांनी विजेचे बटन दाबताच स्फोट झाला. स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले होते. घरांची पडझड झाल्याने अकरा जण गंभीर जखमी झाले होते. या जखमींना मुंबईतील शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सलीम शेख व शबाना शेख हे स्फोटात गंभीररीत्या भाजले होते.

 

व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चौघांना अटक

डोंबिवली :  ठाण्यातील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडील सव्वा तीन लाखांची रोकड लुटणाऱ्या चौघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने अटक केली. या आरोपींनी पैसे लुटल्यानंतरही त्या व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडे दहा लाखांची खंडणी मागितली. मात्र व्यापाऱ्याने शिताफीने या चौघांच्या तावडीतून सुटका करून घेत पोलिसांत तक्रार केली. हेमंत ऊर्फ मुसा गवळी (३४), नितेश पाटील (२४), वेताळ रमेश पाटील (२३), सतीश ऊर्फ सत्या पहुडकर (२२) या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पूजा रेसिडेन्शियल सोसायटीत मयूर राणे (२२) राहतात. ‘स्नॅप डील’ या कंपनीचे ते वितरक आहेत. त्यांची हेमंत गुळवी याच्यासोबत नुकतीच ओळख झाली. गुळवीने राणे यांची माहिती मिळवून त्यांच्या अपहरणाचा कट रचला. २३ जुलैला त्यांचे अपहरण केले. त्यांच्याकडील रोकड लुटली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडे खंडणी मागितली. त्यांना एके ठिकाणी कोंडून ठेवले; परंतु पैसे घरी असल्याचे सांगितल्याने आरोपींनी राणे यांना त्यांच्या घरी आणले. त्याच वेळी राणे यांनी घराचे दार बंद करून पोलिसांशी संपर्क साधला.