कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या टिटवाळा अ प्रभागातील जबाबदार अधिकारी बदली होताच महिनाभरापासून टिटवाळा परिसरात वर्षभर रोखलेली बेकायदा बांधकामे आता दिवस, रात्र भूमाफियांनी सुरू केली आहेत. नवीन जबाबदार अधिकाऱ्याचा या बेकायदा बांधकामे आणि फेरीवाल्यांवर कोणताही वचक राहिला नसल्याची चर्चा टिटवाळा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.

मागील वर्षभर पूर्णपणे थांबविण्यात आलेली बेकायदा बांधकामे आता नव्याने सुरू झाल्याने टिटवाळा, मांडा, मोहने, आंबिवली, शहाड, वडवली, बनेली, बल्याणी, नांदप रस्ता, वासुंद्री रस्ता भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. दोन वर्षापूर्वी अ प्रभाग हद्दीत अधिक प्रमाणात बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे सुरू होती. ही बांधकामे जमीनदोस्त करावीत म्हणून तत्कालीन आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी नियमित अ प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांना सांगितले. पण, त्यांच्याकडून आक्रमक कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या आयुक्त डाॅ. जाखड यांनी साहाय्यक आयुक्त रोकडे यांना टिटवाळा परिसरातील बेकायदा बांधकामांना जबाबदार धरून निलंबित केले होते. त्यांच्या जागी साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची तडकाफडकी नियुक्ती केली होती.

पदभार मिळताच साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी मागील वर्षभराच्या कालावधीत जुनी, नव्याने उभी राहत असलेली सुमारे पाच ते सहा हजाराहून अधिक बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची अ प्रभागाच्या तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केली. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी, पावसाळ्यातही त्यांनी ही कारवाई सुरू ठेवली होती. या सततच्या कारवाईमुळे पाटील यांनी भूमाफियांचे कंबरडे मोडले होते. साहाय्यक आयुक्त पाटील यांच्या बदलीसाठी काही भूमाफियांनी राजकीय संबंधातून पालिका वरिष्ठांकडे प्रयत्न केले होते.

या सततच्या कारवायांमुळे आणि भूमाफियांचे आर्थिक कंबरडे मोडल्याने टिटवाळा परिसरातील जाणते नागरिक समाधानी होते. गेल्या महिन्यात पालिकेत १५४ अधिकाऱ्यांना पदोन्नत्या मिळाल्या. या पदोन्नत्ती प्रक्रियेमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. या बदली प्रक्रियेत टिटवाळा अ प्रभागातील बेकायदा बांधकामांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची ब प्रभागात कर अधीक्षक म्हणून बदली झाली. आता अ प्रभागात साहाय्यक आयुक्त म्हणून जयवंत चौधरी यांनी पदभार स्वीकारला आहे.

चौधरी प्रथमच साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार सांभाळत आहेत. ते यापूर्वी डोंबिवलीतील फ प्रभागात अधीक्षक पदावर कार्यरत होते. चौधरी यांनी पदभार स्वीकारताच टिटवाळा, बनेली, बल्याणी, वडवली, आंबिवली, शहाड, वासुंद्री रस्ता भागात भूमाफियांनी मुख्य वर्दळीचे रस्ते, यापूर्वी तोडलेल्या बेकायदा चाळींच्या जागी दिवस रात्री कामे करून बेकायदा चाळी, व्यापारी गाळे उभारण्याची कामे सुरू केली आहेत. एकावेळी अ प्रभाग हद्दीत बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू झाल्याने स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. आयुक्त अभिनव गोयल, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त समीर भूमकर यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याची टिटवाळा परिसरातील नागरिकांची मागणी आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर आलेल्या दिवाळी सुट्ट्या, त्यानंतर मतदार याद्यांची कामे आणि इतर प्रशासकीय कामांमुळे प्रभागात लक्ष देता आले नाही. पण, प्रभागातील सुरू झालेली सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली जातील. – जयवंत चौधरी, साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग.