कल्याण : नोकरीला लागल्यापासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या. आपली बदली होणार नाही यासाठी राजकीय दबाव आणून बदली रोखणाऱ्या, ठेकेदारांशी संगनमत करून विभागात स्वताची वतनदारी निर्माण करणाऱ्या कल्याण डोंबिवली पालिकेतील विविध विभागातील सहा वर्षापासून अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची एकत्रित माहिती सादर करण्याचे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. आयुक्तांचे आदेश असल्याने ही माहिती संकलनाचे काम जोराने सुरू आहे. या वावटळीमधील पहिल्या बदलीला लेखा अभियांत्रिकी विभागात १२ वर्ष ठाण मांडून असलेल्या वरिष्ठ लिपिकाच्या बदलीतून प्रारंभ झाला आहे.

पालिकेतील बहुतांश विभागात ठाण मांडलेला लिपिक संवर्गातील कर्मचारी बदलून गेला तर तेथे काहीच काम होणार नाही. तेथे त्या कर्मचाऱ्याला फक्त निविदा, देयक मंजुरी आणि त्या विभागाची माहिती आहे असे वातावरण पालिकेत निर्माण केले जाते आणि तो कर्मचारी त्याच विभागात राहील अशी व्यवस्था वर्षानुवर्ष करण्यात आली. अशा ठाण मांड्या कर्मचाऱ्यांनी आपणास पदोन्नत्ती मिळाली तरी आपला विभाग, खुर्ची सोडली नाही, असे कर्मचारी सांगतात.

काही कर्मचारी वर्षानुवर्ष प्रशासनावर राजकीय दबाव आणून आपला मलईदार विभाग जाणार नाही यासाठी प्रयत्न करतात. आयुक्त गोयल यांच्या हा विषय प्रकर्षाने निदर्शनास आला. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला सहा वर्षाहून अधिक काळ एकाच विभागात असलेल्या पालिकेतील विविध विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत.

सामान्य प्रशासन विभाग उपायुक्त वंदना गुळवे यांनी ही माहिती संकलित करण्यास सुरूवात केली आहे. या ठाणमांडया कर्मचाऱ्यांमुळे इतर कर्मचाऱ्यांचे पदोन्नत्ती, तो विभाग यांचे अधिकार वेळोवेळी डावलेले गेले आहेत. कर्मचाऱ्याची तीन वर्षांनी इतर विभागात झाली पाहिजे असा नियम आहे. पालिकेत १५ ते २० वर्षापासून एकाच विभागात कर्मचारी, अभियंते ठाण मांडून आहेत.

जुलैमध्ये आयुक्त गोयल यांना प्रशासनाकडून सादर करण्यात आलेल्या टिपणीमध्ये शहर अभियंत्यांनी आपल्याकडील वरिष्ठ लिपिक (लेखा) वसंत माढा यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांची बदली करून त्या जागी पांडुरंग भोमरे यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. या टिपणीप्रमाणे आयक्त गोयल यांनी वसंत माढा यांना लेखा विभाग मुख्यालयात पाठविण्याची सूचना केली होती. आयुक्तांंनी सूचना करूनही त्यावेळी अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने माढा यांची बदली न करता त्यांना लेखा अभियांत्रिकीमध्ये सक्रिय ठेवण्यात आले. त्यांच्या सोबतच्या यशवंत सोनार यांची लेखा अभियांत्रिकी विभागात, हितेश वालोदरा यांची सार्वजनिक विभागात बदली करण्यात आली. माढा यांना यावेळी अभय देण्यात आले असल्याची पालिकेत चर्चा होती.

ठाणमांड्याच्या माहितीत वसंत माढा यांची बदली न केल्याचा प्रकार उघडण्याची शक्यता असल्याने त्यांची घाईत गुरूवारी लेखा विभाग मुख्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती करण्यात आली. यामुळे ठाणमांड्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अटळ असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. जे प्रभागातील पर्यवेक्षक सचिन चव्हाण यांची शास्त्रीनगर रुग्णालयात बदली करण्यात आली आहे.