कल्याण-डोंबिवली पालिकेच्या मांडा-टिटवाळा येथील ‘अ’ प्रभाग कार्यालयातील तत्कालीन प्रभाग अधिकारी सुनील पाटील यांना आयुक्त पी. वेलरासू यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात टाळाटाळ केल्याचा ठपका ठेवत शुक्रवारी सेवेतून निलंबित केले. बेकायदा बांधकामप्रकरणी निलंबित झालेले पाटील हे दुसरे प्रभाग अधिकारी आहेत. यापूर्वी ‘ई’ प्रभागाचे प्रभाकर पवार यांना निलंबित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी आयुक्त ई. रवींद्रन यांचा ‘पाठीराखा’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, त्या कामाची पावती म्हणून पात्रता, ज्येष्ठता नसताना कनिष्ठ अभियंता सुनील पाटील यांना रवींद्रन यांनी मांडा-टिटवाळा प्रभागाचे प्रभाग अधिकारी म्हणून दोन वर्षांपूर्वी नियुक्त केले होते. या काळात पाटील यांनी जबाबदारीने काम करण्याऐवजी आयुक्त पाठीशी आहेत म्हणून मांडा-टिटवाळा भागात सरकारी, गुरचरण, आरक्षित, खासगी जमिनींवर सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर तक्रारी येऊनही कारवाई करण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी अनेक नागरिकांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या.  तक्रारींची दखल घेऊन सुनील पाटील यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे आवश्यक होते. पण, भूमाफियांशी संगनमत केल्याचा आरोप आहे. पाटील यांचे उद्योग आयुक्त वेलरासू यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पाटील यांना कारणे दाखवा नोटिस बजावली. त्यानंतर त्यांना प्रभाग अधिकारी पदावरून मूळच्या कनिष्ठ अभियंता पदावर पदावनत केले होते. आंबिवलीतील नूतन, भास्कर विद्यालयातील बांधकामे, टिटवाळा येथे लक्ष्मण भोईर यांचे मंगल कार्यालय, शहाड उड्डाण पुलाखालील जगदंबा मार्बल अशा अनेक बेकायदा बांधकामांच्या तक्रारीवर सुनील पाटील यांनी कारवाई केली नाही. वेलरासू यांनी त्यांना पालिका सेवेतून निलंबित केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivli municipal corporation officer sunil patil suspended
First published on: 03-02-2018 at 04:22 IST