कल्याण : कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील अनेक तरूण, तरूणींना कल्याण डोंबिवली पालिकेच्या नोकर भरतीसाठी अर्ज केले आहेत. या नोकर भरतीसाठीची लेखी परीक्षा मुंबईतील पवई केंद्रावर मंगळवारी होती. सकाळी सहा वाजता घरातून बाहेर पडलेले परीक्षार्थी तरूण, तरुणी लोकल प्रवास, वाहतूक कोंडीवर मात करत टीसीएसच्या पवई परीक्षा केंद्रावर पोहचले. पण एक सेकंद आणि एक मिनिटाचा फरक पडल्याने सुरक्षा रक्षक, परीक्षा नियंत्रक यांनी या उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी पालिका परीक्षेला मुकले आहेत. या उमेदवारांनी बुधवारी पालिकेत येऊन आमची फेर परीक्षा घेण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

मागील तीस वर्षानंतर प्रथमच कल्याण डोंबिवली पालिकेत ४९० पदांसाठी २१ संवर्गांमध्ये नोकरी भरती होत आहे. या नोकर भरतीसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून एकूण ५९ हजार आले आहेत. ही नोकर भरतीची प्रक्रिया कल्याण डोंबिवली पालिका टीसीएस कंपनीच्या साहाय्याने पार पाडत आहे. या नोकर भरतीसाठीची लेखी परीक्षा मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी राज्याच्या विविध भागात एकूण २५ केंद्रे आहेत.

कल्याण, डोंबिवली परिसरातील अनेक तरूण, तरूणींनी या नोकर भरतीसाठी अर्ज केले आहेत. या परीक्षार्थींची मंगळवारी मुंबईत पवई येथे टीसीएसच्या केंद्रावर सकाळी नऊ वाजता परीक्षा होती. कल्याण, डोंबिवलीतील परीक्षार्थी पहाटे पाच ते सहा वाजता घर सोडून लोकलला विलंब, पवईमधील वाहतूक कोंडीवर मात करत बहुतांशी विद्यार्थी पवई परीक्षा केंद्रावर पोहचले. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याची वेळ साडे आठ होती. अनेक परीक्षार्थी परीक्षा केंद्रासमोर रिक्षेतून उतरून परीक्षा केंद्रात जाण्यासाठी प्रयत्नशील होते.

पण, साडे आठ नंतर ही एकाही परीक्षार्थीला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर सुमारे दीडशेहून अधिक परीक्षार्थी प्रवेशद्वार सुरक्षा रक्षक, परीक्षा नियंत्रकांना ओरडून परीक्षा केंद्रात सोडण्याची मागणी करत होते. पण कोणीही आमचे म्हणणे ऐकले नाही, अशा तक्रारी परीक्षेला मुकलेल्या तरूण, तरुणींंनी केल्या.परीक्षा केंद्रात प्रवेश न मिळालेल्या परीक्षार्थींनी बुधवारी कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात येऊन पालिका अधिकाऱ्यांना आमची फेर परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.

आपण वेळेत पवई येथील परीक्षा केंद्रावर पोहचलो होतो. परीक्षा सकाळी नऊ वाजताची होती. साडे आठ वाजता परीक्षा केंद्रात प्रवेश करायचा होता. आम्ही प्रवेशद्वारावर पोहचलो त्यावेळी साडे आठ वाजले होते. काही सेकंद, मिनिटाचा फरक होता, पण आम्हाला सुरक्षा रक्षकाने परीक्षा केंद्रात विनंत्या करूनही सोडले नाही. – पूजा चौधरी, परीक्षार्थी.

लोकल विलंंब, वाहतूक कोंडी या सगळ्यांवर मात करत आम्ही पवईतील परीक्षा केंद्रावर पोहचलो होतो. वेेळेत पोहचुनही सुरक्षा रक्षकाने आम्हाला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला नाही. त्यामुळे आमची फेर परीक्षा घेऊन आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा.- दिव्या सकपाळ, परीक्षार्थी.