डोंबिवली एमआयडीसीतील खंबाळपाडा ते टाटा नाका दरम्यान भरधाव वेगात चाललेल्या एका ट्रकने एका दुचाकी स्वाराला जोराची धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री दोन वाजता हा अपघात घडला.

ट्रक चालक विजय सोनावणे याच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक नाशिक जिल्ह्यातील बागलण तालुक्यातील आरई गावचा रहिवासी आहे. खंबाळपाडा रस्त्यावरील अम्बे मा वजन काट्याजवळ हा अपघात घडला. संदीप गुप्ता (३४) यांच्या तक्रारी वरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयत हा कल्याण मधील इंदिरानगर मधील रहिवासी आहे.

पोलिसांनी सांगितले, नाशिक येथील ट्रक चालक विजय सोनावणे हा आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन अंबे मा वजन काट्याकडे ट्रकमधील मालाचे वजन करण्यासाठी चालला होता. खंबाळपाडा रस्त्याने वेगाने जात असताना चालक सोनावणे याचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक जोराने समोर चाललेल्या दुचाकी स्वाराला धडकला. अचानक ट्रक अंगावर आल्याने दुचाकी रस्त्यावर पडली आणि दुचाकी स्वार ट्रकच्या चाकाखाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.