कल्याण – कल्याण मधील ज्येष्ठ विधिज्ञ आणि दिवाणी कायद्याचे तज्ज्ञ दत्तात्रय निळकंठ उर्फ अप्पा सबनिस यांचे शनिवारी दत्त आळीतील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ९७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे उज्जवल आणि रमेश सबनिस, मुलगी तिलोत्तमा, स्नुषा अर्चना, नातवंडे, जावई, पतवंडे असा परिवार आहे.
कल्याण मधील सबनिस कुटुंब हे पीढीजाद खानदानी वकिली व्यवसाय करणाऱ्या परंपरेतील कुटुंब आहे. त्यांच्या घरातील चौथी पीढी आता वकिली व्यवसायात आहे. कल्याण मधील ज्येष्ठ वकील दिवंगत श्रीधर निळकंठ उर्फ भाऊसाहेब सबनिस यांचे अप्पा सबनिस हे धाकटे बंधू होते. अप्पा सबनिस यांनी साठ वर्ष अतिशय निष्ठा, सचोटी आणि प्रामाणिकपणाने वकिली व्यवसाय केला. शांत आणि संयमी स्वभाव हे त्यांचे वैशिष्टय होते. आपल्याकडे पक्षकाराकडून दाखल न्यायालयीन प्रकरणाचे गांभीर्य, पक्षकाराची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन त्यांनी अनेक वेळा सामाजिक भाव जागृत ठेऊन सेवाभावी वृत्तीने आशिलांचे अनेक दावे चालविले. त्या प्रकरणात आशिलांना न्याय मिळून दिला.
अप्पा सबनिस यांचे यांचे आजोबा, त्यानंतर त्यांचे वडील निळकंठराव सबनिस, आणि पुढे सबनिस कुटुंबातील पीढी वकिली व्यवसायात उतरली. आपल्या कुटुंबाचा वकिली व्यवसायाचा पेशा पुढे निष्ठा, सचोटीने सुरू ठेवला आहे. अप्पा सबनिस यांचा वारसा आता त्यांच्या स्नुषा ॲड. अर्चना रमेश सबनिस पुढे चालवत आहेत. वकिली व्यवसाय सांभाळताना कल्याण शहरातील काही सामाजिक, धार्मिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध होते. कल्याण मधील महालक्ष्मी मंदिर, लक्ष्मी नारायण देवस्थानचे ते अनेक वर्ष विश्वस्त होते. या दोन्ही मंदिर संस्थांचा कारभार त्यांनी पारदर्शकपणे पाहिला.
पक्षकारांच्या तीन पीढ्यांची नाळ सबनिस कुटुंबियांशी जोडली गेली आहे. वकिलीचा अभ्यास पूर्ण करून न्यायालयात प्रशिक्षणार्थी वकील म्हणून सराव करण्यासाठी अनेक कायद्याचे पदवीधर सबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळेल यासाठी प्रयत्नशील असत. अशाप्रकारे अनेक वकील अप्पा सबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले.
‘कल्याण शहरातील एका जुन्या काळातील वकील, दिवाणी कायद्याचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे अप्पा सबनिस कल्याण शहराचे भूषण होते. व्यवसायातील निष्ठा, सचोटी काय असते ते अप्पांनी आपल्या वकिली व्यवसायातून दाखवून दिले. अप्पांच्या निधनाने कायद्याच्या क्षेत्रातील एक मोठ व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी प्रतिक्रिया कल्याण मधील ज्येष्ठ वकील ॲड. सुरेश पटवर्धन यांनी दिली.