कल्याण रेल्वे स्थानक भागात रिक्षाचालकांकडून प्रवाशांना होणारा त्रास, फेरीवाल्यांच्या उपद्रवाच्या तक्रारी वाढू लागल्याने या भागातील आमदार नरेंद्र पवार यांनी मंगळवारी या परिसराची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांना फेरीवाल्यांना हा सगळा परिसर काबीज केल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे या भागातील फेरीवाल्यांवर पालिका अधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी कारवाई सुरू करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
कल्याण शहर भागात सोनसाखळ्या, घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. या भुरटय़ा चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘बीट मार्शल’ची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्याकडे करण्यात आली. कल्याण स्थानक भागातील रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे प्रवासी हैराण आहेत.
त्यामुळे केडीएमटीने रेल्वे स्थानक भागातून अधिकाधिक बस शहराच्या विविध भागांत सोडाव्यात, अशी मागणी पवार यांनी केली. कल्याण रेल्वे स्थानक भागातील फेरीवाले, रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे.
यासंबंधीच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. असे असतानाही महापालिका तसेच रेल्वे प्रशासनाकडून त्यावर कारवाई होताना दिसत नाही. या तक्रारींची दखल घेत हा पाहणी दौरा काढण्यात आला होता.