कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रात देखभाल दुरुस्ती आणि महावितरणचे वीज मीटर जोडणीचे काम मंगळवारी करावयाचे आहे. या कामांसाठी मोहिली जलशुध्दीकरण केंद्र येत्या मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या कल्याण शहराचा काही भाग ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा मंगळवारी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे यांनी दिली.

मोहिली जलशुध्दीकरण केंद्र उल्हास नदीच्या काठावर मोहिली गाव हद्दीत आहे. या केंद्रातून पाणी पुरवठा होणाऱ्या मांडा, टिटवाळा, बल्याणी, बनेली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि परिसरातील ग्रामीण भागातील काही गावे, याशिवाय कल्याण पश्चिमेतील ब प्रभाग हद्दीतील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, म्हाडा काॅलनी परिसर, मुरबाड रस्ता, सिंडिकेट परिसराला होणारा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे.

मुसळधार पाऊस सुरू असल्याने उल्हास नदीत डोंगर दऱ्यातून वाहून येणाऱ्या पाण्यात अधिक प्रमाणात गाळ, झाडांचा पाला, झाडांची ओंडकी वाहून येतात. उल्हास नदीतून उदंचन केंद्रात पाणी उचलताना येणाऱ्या जाळ्यांमध्ये गाळ, पालापाचोळा अडकून पडतो. हे पाणी पुन्हा जलशुध्दीकरण केंद्रात सोडताना कितीही क्लोरिनची मात्रा दिली तरी हे पाणी शुध्द करताना अनेक तांत्रिक अडथळे येतात. पाणी उचलणारी आणि शुध्द करणारी यंत्रणा काही वेळा गाळ, मातीच्या कणांनी जाम होते. ही यंत्रणा वेळीच साफ केली नाहीतर अचानक काही तांत्रिक बिघाड होऊ पाणी पुरवठा ठप्प होण्याची शक्यता असते, असे एका माहितगाराने सांगितले.

मंगळवारी दुरुस्तीच्या कामाच्यावेळी महावितरणकडून मोहिली जलशुध्दीकरण मीटर युनिट बसावयाचे आहेत. दिवसभरात किती पाणी उचलले, शुध्द केले याची मोजणी या मीटरच्या माध्यमातून केली जाते. ही अत्यावश्यक कामे मोहिली जलशुध्दीकरण केंद्रात करावयाची असल्याने मंगळवारी कल्याण शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण पूर्व, डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा नियमित सुरू राहणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवावा आणि पालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.