कल्याण : मराठी शादी डाॅट काम या वधु वर विवाह नोंंदणी संकेतस्थळावर ओळख झालेल्या ठाण्यातील घोडबंदर भागात राहत असलेल्या एका बिल्डरने कल्याणमधील ३७ वर्षाच्या एका महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. या महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या बरोबर विवाह करणार असल्याचे ठाम सांगितले. त्यानंतर या महिलेच्या वडिलांकडून या बिल्डरने आपल्या एका बांधकामासाठी १५ लाख रूपये घेतले. त्यानंतर महिलेबरोबर विवाह नाहीच, पण वडिलांकडून घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केली म्हणून या महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ४२०, ५०४, ५०, ६(२) प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. जानेवारी २०२३ ते जुलै २०२३ या कालावधीत या महिलेच्या कल्याण पश्चिमेतील घरात हे व्यवहार आणि फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. वारंवार तगादा लावुनही बिल्डर आपल्या वडिलांचे १५ लाख रूपये परत करत नाही. तसेच, आपल्या बरोबर विवाहही करत नसल्याने त्रस्त झालेल्या या महिलेने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पीडित महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की ठाण्यात घोडबंदर भागात राहणारा हा बिल्डर दोन नावाने वावरतो. त्याची ओळखही तशी आहे. आपली दोन वर्षापूर्वी मराठी शादी डाॅट काॅम या वधु वर नोंदणी विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर ओळख झाली. या ओळखीतून संबंधित विकासकाने आपल्या बरोबर लग्न करण्याची तयारी दर्शवली. तो आपल्या घरी येऊ लागला. आपण बिल्डर आहोत. आपली पुणे येथे इमारत उभारणीची कामे सुरू आहेत, असे तो पीडितेला सांगु लागला. या विकासकाने लग्नाची तयारी दर्शविल्याने महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.

दरम्यानच्या काळात या विकासकाने पुणे येथे आपला गृहप्रकल्प सुरू आहे. या कामासाठी पैशाची चणचण आली आहे. असे पीडित महिलेजवळ बोलून दाखविले. महिलेने आपल्या वडिलांजवळ हा विषय काढला. गृहप्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम व्याजासह परत करण्याचे बिल्डर बोलत होता. या बिल्डर सोबत आपले लग्न होणार आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक अडचणीच्यावेळी आर्थिक साहाय्य केले तर ते पैसे कोठे जाणार नाहीत. हे पैसे आपण सहज मिळवू असे पीडितेला वाटले.

पीडितेच्या वडिलांनी बिल्डरच्या पुण्याच्या गृहप्रकल्पासाठी १५ लाख रूपये देण्याचे आश्वासन बिल्डरला दिले. ठरल्याप्रमाणे ती रक्कम बिल्डरच्या स्वाधीन केली. दरम्यानच्या काळात बिल्डरने हळुहळु पीडिते बरोबरचा संपर्क कमी करण्यास सुरूवात केली. पीडित महिला बिल्डरला लग्नाचे सारखे विचारू लागली. त्यावेळी तो वेळकाढुपणाची उत्तरे देऊ लागला. वडिलांकडून घेतलेले पैसे पीडिता बिल्डरकडून परत मागू लागली. तो देण्याची आश्वासने देऊ लागला.

आता दोन वर्ष होत आली तरी बिल्डर आपल्या बरोबर लग्न करत नाही. आपल्या वडिलांकडून घेतलेले पैसे १५ लाख रूपये परत करत नाही. त्यामुळे तो आपली फसवणूक करत आहे याची पक्की खात्री पटल्यावर पीडितेने खडकपाडा पोलीस ठाण्यात या बिल्डर विरुध्द तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन दांडेगावकर याप्रकरणाचा तपास करत आहेत.