पु. भा. भावे यांचे समग्र साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध होणार
डोंबिवली भूषण, भाषाप्रभू, ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत पुरुषोत्तम भावे यांच्या नावाने डोंबिवली पश्चिमेत महात्मा गांधी मार्गावर दोन माळ्याची प्रशस्त वास्तू उभी आहे. सहा वर्षांपूर्वी या वास्तूचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीकरांना दिले होते. महापालिकेत युतीची सत्ता असूनही सहा वर्षांत भावे यांच्या वास्तूचा पुनर्विकास प्रशासनाकडून झालेला नाही. आता या वास्तूचा पुनर्विकास करण्याचा निर्णय महापालिकेने उशिरा का होईना घेतला असून यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
भावे सभागृहाजवळ असलेल्या वाटवेवाडीत भावे यांचे निवासस्थान होते. निधनानंतर त्यांच्या नावाने शहरात एक वास्तू असावी म्हणून काही वर्षांपूर्वी डोंबिवली पश्चिमेत रेल्वे स्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर दोन माळ्याची प्रशस्त इमारत उभारण्यात आली. सुरुवातीला या वास्तूत भावे यांचे समग्र साहित्य उपलब्ध होईल. सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांना हे सभागृह उपलब्ध होईल, असे साहित्यिक, रसिकांना वाटले होते. या वास्तूत तलाठी, मंडल कार्यालय, त्यावर शाळा आणि तळ मजल्याला निवडणूक कार्यालय अशी व्यवस्था दिसून येत होती. साहित्यिकाच्या नावाची वास्तू सरकारी कार्यालयांना वापरण्यास दिल्याने शहरवासीय तीव्र नाराजी व्यक्त करीत होते. या वास्तूत विकासक, जमीनदार यांचीच सातबारा उतारे घेण्यासाठी सर्वाधिक ऊठबस होती. त्यामुळे कोणीही विचारी साहित्यिक, रसिक कधी या वास्तूकडे फिरकला नाही.
सहा वर्षांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वीच्या प्रचार सभेत बोलताना, पु. भा. भावे यांच्या नावाने असलेली वास्तू पुनर्विकसित करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. सहा वर्षांत या विषयावर फक्त चर्चा होत राहिल्या. प्रत्यक्ष कृती पालिकेतील सत्ताधारी पक्षाकडून झाली नाही. याविषयी सतत साहित्यिकांकडून नाराजीचा सूर काढण्यात येत असल्याने यावेळी पालिकेने भावे सभागृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणची सरकारी कार्यालये अन्यत्र हलविण्याचा विचार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.