कल्याण डोंबिवली पालिकेच्या ई प्रभागातील धक्कादायक प्रकार
डोंबिवली – मागील वर्षी कल्याण डोंबिवली पालिकेच्या २७ गावांमधील रिजन्सी इस्टेट येथील ई प्रभाग कार्यालयात फेरीवाला हटाव पथकातील कामगार कार्यालयीन वेळेत कार्यालयाजवळील एका निवाऱ्यात दुपारच्या वेळेत जुगार (पत्ते) खेळत होते. पालिकेच्या वरिष्ठांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई न करता या जुगार खेळणाऱ्यांना अभय दिले. त्यामुळे हिम्मत वाढलेल्या ई प्रभागातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी ई प्रभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत कार्यालयातील कर्मचारी असलेल्या एका तरूणीच्या लग्नाच्या प्रीत्यर्थ केळवणाची मेजवानी साजरी केली.
हा सगळा प्रकार पाहून ई प्रभाग कार्यालयात आलेले नागरिकही आश्चर्यचकित झाले. एक सक्षम भारतीय सनदी सेवेतील अधिकारी आयुक्त म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेला लाभलेला असताना कनिष्ठ कर्मचारी आणि प्रभाग स्तरावरील प्रशासनात शैथिल्य आणि मनमानी, अनागोंदी सुरू असल्याने शहरातील नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागातील रूपेश जाधव, कमलेश सोनावणे, अनिल शिरपूरकर हे कर्मचारी मागील काही महिन्यांपासून तक्रारी आणि चौकशीच्या फेऱ्यात आहेत. तरीही पालिकेतील वरिष्ठांचा त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यास हात थरथरत आहे. याच वरिष्ठांनी गेल्या वर्षी पालिकेच्या ई प्रभागात कार्यालयीन वेळेत जुगार खेळणाऱ्या कामगारांना कारवाई न करता अभय दिले होते.
त्यामुळे पालिकेच्या ई प्रभाग कार्यालयात कार्यालयीन वेळेत काहीही केले तरी वरिष्ठ कारवाई करत नाहीत. याची भीड चेपल्याने ई प्रभागातील काही शिरजोर कर्मचाऱ्यांनी बुधवारी ई प्रभागाच्या रिजन्सी इस्टेट येथील कार्यालयात प्रभागात आलेल्या नागरिकांची कामे करून देण्याऐवजी कार्यालयातील एका लग्नाच्या बोहल्यावर चढणाऱ्या कर्मचारी महिलेच्या लग्नाच्या केळवणाच्या मेजवानीचे आयोजन केले होते.
आपल्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान म्हात्रे ई प्रभाग कार्यालयात आले होते. तेव्हा त्यांना कार्यालयीन वेळेत लेखापालांच्या दालनामध्ये मंचकावर केक आणि इतर मिष्टान्न ठेऊन जोरात हासतखेळत मेजवानी सुरू असल्याचे दिसले. म्हात्रे यांनी ही कसली मेजवानी सुरू आहे, असे प्रश्न कर्मचाऱ्यांना केले. तेव्हा त्यांना ही केळवणाची मेजवानी सुरू असल्याचे सांगण्यात आले. कार्यालयीन वेळेत तुम्ही ही कसली मेजवानी करता. पहिले लोकांची कामे करा, असा सल्ला सत्यवान म्हात्रे यांनी कर्मचाऱ्यांना देऊन सुरू असलेल्या मेजवानीचे आपल्या मोबाईलमधून दृश्यध्वनी चित्रण सुरू केले. त्या बरोबर लेखापाल दालनातील कर्मचारी दालनातून निघून गेले.
सत्यवान म्हात्रे यांनी या सर्व प्रकाराची लेखी तक्रार आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांचेकडे ई प्रभागात घडलेल्या मेजवानीच्या छायाचित्रांसह केली आहे. कार्यालयीन वेळेत सहभागी या मेजवानीतील कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मागील काही महिन्यांपासून पालिका प्रशासन पूर्ण ढिले पडेल असून प्रशासनावर कोणाचा वचक आहे की नाही असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. याप्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
केळवण मेजवानी म्हणजे
घरातील तरूणी लग्न होऊन सासरी जाणार असते. त्यामुळे तिला तिच्या नातेवाईक, मित्र, स्वयकीयांकडून मिष्टान्नांचे भोजन दिले जाते. तिला भेट वस्तू दिल्या जातात.
