२७ गावे पुन्हा संघर्षांच्या पवित्र्यात; निधी नसल्याचे कारण देत समस्यांकडे कडोंमपाचे दुर्लक्ष
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका होऊन दोन महिने उलटले आहेत. तरीही महापालिकेकडून २७ गावांमधील पाणी, रस्ते, पथदिवे, गटारे, पायवाटा, स्मशानभूमी दुरवस्था या महत्त्वाच्या विषयांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. २७ गावांतील नगरसेवकांनी महापालिकेला नागरी सुविधा देण्याबाबत पत्रे दिली. त्यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी या कामांसाठी निधी उपलब्ध नसल्याची उत्तरे २७ गावांमधील नगरसेवकांना दिली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय ग्रामीण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेला झेपत नसतील तर, गावे बाहेर काढण्याचा प्रस्ताव शासनाला द्यावा आणि शासनाने आमचा नगरपालिकेचा मार्ग मोकळा करावा अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
२७ गावांमधील नागरी समस्या, महापालिकेची विकास कामे करण्यासाठी असलेली नकारघंटा या विषयावर चर्चा करण्यासाठी व आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी सर्वपक्षीय हक्क संघर्ष समितीने मानपाडा येथील मानपाडेश्वर मंदिर येथे सायंकाळी ४.०० वाजता एका बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार यांनी दिली.
अपुरा पाणीपुरवठा, रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ही कामे प्राधान्याने करणे आवश्यक आहे. परंतु, पालिकेकडे नगरसेवकांनी निधीची मागणी केली तर, २७ गावांसाठी निधी उपलब्ध नसल्याची कारणे देण्यात येत आहेत. पालिकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून २७ गावांमध्ये नागरी सुविधा मिळणे कठीण आहे. या विषयावर विचार करण्यासाठी, तसेच येणाऱ्या काळात संघर्ष समितीची पालिकेबाबतची भूमिका निश्चित करण्यासाठी येत्या सोमवारी सभा आयोजित केली आहे, असे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

राजकीय स्वार्थासाठी २७ गावांचा बळी
कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. महापालिकेला शहरी पट्टय़ात विकास कामे करताना आर्थिक अडचणी येत आहेत. ही महापालिका २७ गावांचा भार डोक्यावर घेऊन आणखी अडचणीत येईल. त्यापेक्षा २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करा, अशी संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांची शासनाकडे मागणी होती. शासनाने या मागणीला मान्य केले होते. काही मूठभर राजकीय मंडळींनी आपल्या पक्षीय स्वार्थासाठी गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा तसेच संघर्ष समितीला महापालिका निवडणुकीत उतरविण्यास भाग पाडले. ज्यांनी राजकीय स्वार्थासाठी २७ गावांचा बळी दिला. त्यांना कमी जागा मिळाल्यामुळे त्यांचा मुखभंग झाला आहे. महापालिकेत आता या मंडळींची सत्ता आहे. त्यामुळे २७ गावांना दिलेल्या शब्दाप्रमाणे विकास कामे देणे या सत्ताधाऱ्यांचे काम आहे. पण, ती जबाबदारी पार पाडण्यात आता ते कच खाऊ लागले आहेत, असा आरोप संघर्ष समितीकडून करण्यात आला आहे.