scorecardresearch

Premium

कल्याणमध्ये सिग्नलशिस्त

कल्याण-डोंबिवली शहराचा विकास झपाटय़ाने होत असला तरी येथील वाहतूक व्यवस्था अजूनही विस्कळीत आहे.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

महापालिका ३० चौकांत अत्याधुनिक यंत्रणा लावणार; तब्बल १८ वर्षांनंतर निर्णय

शलाका सरफरे, कल्याण</strong>

गेली १८ वर्षे सिग्नलविना असलेल्या कल्याण-डोंबिवलीतील ३० महत्त्वाच्या चौकांत सिग्नल लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. चौकांमधील वाहतुकीचे सर्वेक्षण आणि वाहतूक पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त पाहणीतून आराखडा तयार करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी संबंधित ठेकेदारास त्यावरील जाहिरातीचे हक्क दिले जाणार आहेत.

कल्याण-डोंबिवली शहराचा विकास झपाटय़ाने होत असला तरी येथील वाहतूक व्यवस्था अजूनही विस्कळीत आहे. या दोन्ही शहरांमध्ये कोठेही सिग्नल नसल्याने येथील वाहतुकीचे नियंत्रण करताना पोलिसांच्या अक्षरश नाकीनऊ येतात. त्यामुळे ही यंत्रणा कार्यान्वित करावी असा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून सातत्याने महापालिकेस दिला जात होता. साधारण १८ ते २० वर्षांपूर्वी शहरातील काही भागांमध्ये सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली होती. या यंत्रणेच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आणि सिग्नल बंद पडले. त्यानंतर १८ वर्षे या दोन्ही शहरांत सिग्नल यंत्रणा अस्तित्वात नाही. आता अखेर महापालिकेकडून अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी महापालिकेने स्वारस्य निविदा काढली आहे.

नव्या पद्धतीच्या एलईडी दिव्यांचा वापर या यंत्रणेत करण्यात येणार असून लुकलुकणारे दिवे, सिग्नलचा वेळ दर्शवणारे घडय़ाळ, पादचाऱ्यांसाठी दिशादर्शक, जमिनीअंतर्गत वाहिन्या, तीन महिन्यांची नियोजित व्यवस्था, एलसीडी वरून ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून सामाजिक संदेश आणि जाहिराती देण्याची व्यवस्था नव्या प्रणालीमध्ये असणार आहे. ही यंत्रणा २४ तास कार्यान्वित राहील. देखभाल दुरुस्तीची व्यवस्थाही या कंपनीस करावी लागणार आहे.

सिग्नल लावण्यात येणारी ठिकाणे

दुर्गाडी सर्कल, लालचौकी, काबुलसिंग चौक, सहजानंद चौक, शिवाजी चौक, गुरूदेव हॉटेल, केसी गांधी चौक, गोविंदवाडी बायपास, आधारवाडी सर्कल, खडकपाडा सर्कल, संदीप हॉटेल चौक, पूर्णिमा चौक, सुभाष चौक, स्टेट बँक चौक, सूचक नाका, नेतीवली, चार रस्ता, घरडा सर्कल, मानपाडा, अक्षय हॉस्पिटल, मंजुनाथ, संतनामदेव चौक, इंदिराचौक, टिळक चौक, एस. के. पाटील चौक, महात्मा फुले चौक, शेलार चौक, काटई चौक, रिजन्सी चौक, काटेमानवली नाका.

महापालिकेची नियमावली

या सिग्नलवर जाहिरात फलक बसवण्याचे अधिकार कंपनीला देण्यात येणार असले तरी त्यावर महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे नियंत्रण राहणार आहे. दैनंदिन समन्वय राखणे, देखभाल दुरुस्ती ही कामे देखील कंपनीस करावी लागणार आहेत. केवळ सिग्नलसाठी महापालिका वीज पुरवठा देणार आहे, असे स्पष्ट निर्देश पालिकेकडून करण्यात आले आहेत. शिवाय या यंत्रणेतील बिघाडांमुळे अपघात घडल्यास त्यास ती कंपनी जबाबदार राहणार असल्याचे नियमावलीत स्पष्ट केले आहे.

अत्याधुनिक सिग्नलमुळे वाहतुकीला शिस्त लागेल. परिणामी वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. नुकतीच यासाठी निविदा काढण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणेच्या मोबदल्यात संबंधित कंपनीला जाहिरात हक्क देण्यात येतील.

-प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका

अनेक वर्षे सिग्नलसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत होतो. अखेर कल्याण शहरासाठी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी पालिकेला स्थायी समितीने सूचना केल्या, त्यानुसार सध्या निविदा काढण्यात आल्या असून लवकरच सिग्नल सुरू होतील.

-राहुल दामले, स्थायी समिती सभापती

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kdmc set up advanced technology signal in 30 important places in kalyan

First published on: 17-10-2018 at 01:25 IST

आजचा ई-पेपर : ठाणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×