गेल्या साडेचार वर्षांपासून पाणीटंचाईने आधीच बेजार असलेल्या कल्याण पूर्व भागातील नागरिकांना आता गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. हा आयता मुद्दा हाताशी धरत विरोधी पक्षांनी पाणीटंचाई आणि दूषित पाण्याच्या मुद्दय़ावर शिवसेनेला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे.
कल्याण पूर्व भागातील तीन ते चार लाख लोकवस्तीला ७० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३० ते ३५ दशलक्ष लिटर पाणीच पुरवले जात आहे. या मुद्दय़ावरून पालिकेच्या सर्वसाधारण नेहमीच विरोधक आक्रमक होताना दिसतात. मागील सर्वसाधारण सभेत कल्याण पूर्व विभागाचा पाणीपुरवठा १५ दिवसांत सुरळीत करण्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी दिले होते. मात्र २० दिवस लोटूनही पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने यंदाची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची मागणी या भागातील नगरसेवकांनी केली. मात्र काही भागात पाणीपुरवठा व्यवस्थित सुरू झाला आहे, असे सांगत महापौरांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समाधान न झाल्याने नगरसेवकांनी सभागृहात सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. पूर्व भागात अद्याप मुबलक पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. तसेच गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणी घराघरांत येत आहे, अशी परिस्थिती नगरसेविका माधुरी काळे, नरेंद्र गुप्ते यांनी मांडली.
‘प्रभागात फिरा म्हणजे लोकांची पाणीटंचाईची दु:खे कळतील’, असा टोमणा काळे यांनी महापौरांना मारला. त्यावरून माधुरी काळे आणि महापौर पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
पाणी पळविण्याचा प्रयत्न?
कल्याण पश्चिमेच्या काही भागांत आता पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे पश्चिम भागाचे पाणी पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी सांगताच सभागृहात गदारोळ उडाला. पूर्व आणि पश्चिम असा वाद या ठिकाणी रंगवू नये, असे आवाहन या वेळी विरोधी पक्षनेते विश्वनाथ राणे यांनी केले. कल्याण पूर्व भागात मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी विभागाला २३ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. २० दिवस उलटले तरी आयुक्तांनी हा कर्मचारी वर्ग पाणी विभागाला उपलब्ध करून दिलेला नाही, त्यामुळे हा प्रश्न चिघळत असल्याची टीका मंदार हळबे यांनी केली. जलकुंभावरून टाकण्यात आलेल्या जलवाहिन्यांची चाचणी घेताना गढूळ पाण्याचा पुरवठा होतो, असे हळबे यांनी स्पष्ट केले. आयुक्त मधुकर अर्दड यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाला २३ कर्मचारी उपलब्ध करून देत असल्याचे सभागृहात जाहीर केले.