कल्याण-डोंबिवली महापालिकेचा निर्णय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता प्रतिनिधी

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहर कचरामुक्त करण्याची मोहीम प्रगतिपथावर असताना काही रहिवाशी हेतुपुरस्सर रस्त्यावर कचरा फेकून या मोहिमेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनजागृती करूनही काही रहिवासी शून्य कचरा मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करीत नसल्याने अशा रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या रहिवाशांवर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करून तेथून त्यांना न्यायालयात समज देण्यासाठी हजर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

कल्याण-डोंबिवलीतील अशा १५ रहिवाशांवर घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे. कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या कडेला नियमित कचरा टाकला जात असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना मिळाली होती. पहाटेच्या वेळेत या भागात कर्मचाऱ्यांनी पाळत ठेवून कचरा रस्त्यावर फेकणाऱ्या तीन रहिवाशांना पकडले. तात्काळ त्यांची रवानगी कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात केली. तेथे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात समज देण्यासाठी हजर करण्याचीही प्रक्रिया पूर्ण केली. रस्त्यावर कचरा फेकला तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन न्यायालयातही हमीपत्रावर पुन्हा कचरा फेकणार नाही हे सांगावे लागते हे रहिवाशांना कळावे या उद्देशातून प्रशासनाने या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

कचऱ्याच्या संदर्भात बेशिस्त वागणाऱ्या रहिवाशांना अद्दल घडावी यासाठी प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले. गेल्या वर्षभरापासून पालिकेकडून शून्य कचरा मोहीम राबवून शहर कचरामुक्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ओला, सुका कचरा वेगळा करून आधारवाडी कचराभूमीवर नेला जात आहे. येत्या काही महिन्यांत ही कचराभूमी बंद करण्याचे घनकचरा विभागाचे प्रयत्न आहेत.  १०० हून अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी स्वत:चे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले तर कचऱ्याची समस्या कायमची संपुष्टात येणार आहे. हे प्रबोधन करूनही काही रहिवासी पालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कचऱ्याच्या विषयावर प्रशासनाला अधिक कठोर व्हावे लागत आहे, असे कोकरे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc will take action on people throughing garbage on road dd
First published on: 12-03-2021 at 02:40 IST