देवाणघेवाणीच्या वादातून अपहरणाचा प्रकार

डोंबिवली : देवाणघेवाणीच्या वादातून तीन जणांनी डोंबिवली पूर्वेतील स्टार कॉलनीत राहत असलेल्या ६५ वर्षांच्या नागरिकाचे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अपहरण केले होते. त्यांच्या पत्नीने मानपाडा पोलीस ठाण्यात पतीच्या अपहरणाची तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपास पथके तयार करून नालासोपारा येथील गोराई नाका येथील एका हॉटेलमधून तीन जणांना अटक केली आणि अपहृताची सुटका केली.

अपहृत सुभाषिश बॅनर्जी (६५) डोंबिवलीतील स्टार कॉलनीमध्ये पत्नी, मुलीसह राहतात. नौकानयन व्यवसायात मध्यस्थ म्हणून ते यापूर्वी काम करत होते. तेथेच आरोपी मनजीत यादव हाही मध्यस्थ म्हणून काम करत होता. समव्यावसायिक असल्याने दोघे एकमेकांना ओळखत. त्यांच्यामध्ये आर्थिक व्यवहाराविषयी वाद होता. वारंवार मागण्या करूनही पैसे मिळत नसल्याने सुभाषिश आणि मनजीत यांच्यात खटके उडत होते. आपला जुना व्यवहार पूर्ण होत नाही याची जाणीव झाल्याने मनजीत यादवने आपल्या दोन साथीदारांसह सुभाषिश यांचे अपहरण करण्याचा कट रचला.

१ जानेवारीला मनजीत आणि त्याचे दोन साथीदार धनंजय यादव व सोमप्रकाश यांनी बॅनर्जी यांच्या राहत्या घरातून त्यांचे अपहरण केले. सुभाषिश यांची पत्नी खकुमनी आणि मुलगी यांनी केलेला विरोधही या तिघांच्या जबरदस्तीपुढे असफल ठरला. खकुमनी यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना प्रकार कथन केला. त्यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके तयार केली.

अपहरणानंतर काही तासाने सुभाषिश यांच्या मुलीच्या मोबाइलवर मनजीतने संपर्क केला आणि मी पाठविलेल्या बँक खात्यावर तात्काळ पाच लाख रुपये पाठवा, अन्यथा तुमच्या वडिलांना ठार मारू, अशी धमकी दिली. पोलिसांनी मनजीतने मुलीला पाठविलेला बँक खाते क्रमांक तपासला. तो नवी मुंबईतील बँकेचा होता. त्या खात्याच्या आधारे मनजीत हा बेलापूर येथे र्शिंपग मध्यस्थ म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलीस पाठलाग करू नयेत म्हणून मनजीत सतत ठिकाणे बदलत होता. तांत्रिक माहिती आधारे मनजितच्या मोबाइलचा माग काढत पोलीस नालासोपोरा परिसरात गेले. तो गोराई नाका परिसरात असल्याची माहिती मिळाली. गोराईमधील रॉयल इन हॉटेलमध्ये सुभाषिश यांच्या नावाने एक खोली नोंदणीकृत असल्याची व त्यात तीन जण राहात असल्याचे पोलिसांना हॉटेलमधील नोंदीवरून समजले. सुभाषिश यांची सुखरूप सुटका करून पोलिसांनी त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.