tvlogएप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे या शहरांदरम्यान रेल्वे धावली आणि ठाण्याने आधुनिक जगात पाऊल ठेवले. संरक्षण, उद्योग, रेल्वे, विमान, जहाज उद्योगांबरोबर, लोकरी कापड व ज्यूट यांना प्रचंड मागणी येऊ लागली. २१ मार्च १९२३ रोजी सर चिमणलाल सेटलवाड यांनी ठाण्यातील पहिली लोकरी वस्त्र उत्पादन करणारी वाडिया मिल सुरू केली. औद्योगिकीकरणाची ती औद्योगिकीकरणाची ही यशस्वी नांदी ठरली.

स्वा तंत्र्यानंतर ठाण्यात मोठमोठय़ा कंपन्या स्थापन होऊ लागल्या. महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री स. गो. बर्वे यांच्या प्रयत्नाने आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत वागळे इस्टेट नावाने जून १९६१ मध्ये स्थापन झाली. २७५ हेक्टर जमिनीवर सुमारे ६०० प्लॉट लहान-मोठय़ा लघुउद्योगांसाठी पाडण्यात आले. वागळे इस्टेटमध्ये ३३४ इंजिनीअरिंग कंपन्या, ४४ केमिकल कंपन्या, ४८  रबर, प्लास्टिक आणि लेदर प्रॉडक्टस्,  कॉटन सिंथेटिक, फायबर, सिल्क यांवर प्रक्रिया करणारे २४ कारखाने रेडिमेड गारमेंट, पेपर आणि पेपर प्रॉडक्ट, टाइल्स असे अनेक प्रकारचे लघुउद्योग येथे सुरू झाले. यापूर्वीच ठाण्यात मोठे उद्योग, नामवंत कंपन्या स्थापन झाल्या होत्या. त्यात मॉडेला, कॅसल मिल, सेंचुरी स्पिनिंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, केमिकल अ‍ॅण्ड फायबर इंडिया, न्यू शक्ती डाय वर्क्‍स, किरण मिल, ग्लॅक्सो, बोरिंगल, बायर, सँडोज, कलरकेम, देविदयाळ,  एन. आर. बेरिंग लिमिटेड, वायमन गार्डन, इंडोफिल, फायबर ग्लास, कृष्णा ग्लास, बुश, मर्फी, ब्लू स्टार, एशियन केबल, तर खाडीच्या पलीकडे कळवा-बेलापूर या १८ किलोमीटरच्या पट्टय़ात नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (मफतलाल), सीमेन्स, पील, फिलिप्स इंडिया, भारत बिजली, भारत गीअर, नोसिल, हर्डिलिया केमिकल, सर्ल इंडिया, फायझर या आशियातील मोठमोठय़ा कारखान्यांची उभारणी झाली होती. या मोठय़ा कंपन्यांना लागणारा कच्चा माल, मशीन स्पेअर पार्ट, प्रोसेसिंग, वितरण, इत्यादी कामे लघुउद्योग पुरवीत होते.
ठाण्यातील या मोठय़ा कंपन्या आणि लघुउद्योजकांना मनुष्यबळ, कुशल, निमकुशल कामगारांची आवश्यकता होती. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कामगार भरती केंद्र स्थापन करण्यात आले. त्याद्वारे वेगवेगळ्या कामांत तरबेज असणाऱ्या हजारो बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या. कंपनीच्या उत्पादनात त्यापासून मिळणाऱ्या नफ्यात कामगारांचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे कामगारांची सुरक्षितता, आजारपण व घात-अपघातात मदत मिळावी म्हणून १९४८च्या कायद्यानुसार कामगार विमा योजना राबविण्यात आली. भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड), बोनस, भरपगारी रजा आणि इतर भत्ते मिळावेत, योग्य वेळी पगारवाढ मिळावी म्हणून कामगार युनियन स्थापन झाल्या. दि बॉम्बे इंडस्ट्रिअल रिलेशन अ‍ॅक्ट १९४७ नुसार रजिस्टर झालेल्या सुरुवातीच्या काही लेबर युनियन्स ठाण्यातील कंपन्यांमध्ये स्थापन झाल्या. त्यापैकी वल्लभ मिल मजदूर युनियन, ठाणे तालुका व ठाणे म्युनिसिपल बार, दि नॅशनल टेक्स्टाइल वर्कर्स युनियन, वूलन मिल कामगार युनियन, दि मिल मजदूर युनियन (लाल बावटा), ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियन, दि टेक्स्टाइल कामगार सभा व म्युनिसिपल बारसह ठाणे या सर्व लेबर युनियन निरनिराळ्या कंपन्या, इंडस्ट्रीज, बँकिंग, ट्रान्स्पोर्ट, विद्युत मंडळ, इत्यादी ठिकाणी कार्यरत होत्या.
इंडियन ट्रेड युनियन अ‍ॅक्ट १९२६ नुसार १९७०च्या सुमारास ७७ ते ८० लेबर युनियन्स रजिस्टर झाल्या होत्या. १९७० ते ९०चा काळ कंपन्यांच्या भरभराटीचा होता. याच काळात कामगार चळवळी फोफावल्या. कॉ. डांगे, कॉ. कृष्णा खोपकर, आर. जे. मेहता, वालावलकर, सूर्यकांत वढावकर, एम. ए. पाटील, दत्ता सामंत, दत्ताजी साळवी, साबीर शेख इत्यादी कामगार नेते कामगारांच्या भल्यासाठी लढत होते, पण अंतर्गत चढाओढीचा फायदा नफेखोर, भांडवलधारी कंपन्यांनी घेतला. त्यात सरकारच्या अनास्थेमुळे कामगारांचेच अहित होऊ लागले.
शासनाचे अव्यवहारी औद्योगिक धोरण, कामगार चळवळीच्या वाढत्या मागण्या व कारखानदारांची प्रतिकूल भूमिका यामुळे ठाण्याचे झपाटय़ाने औद्योगिकीकरण होऊनही कामगार व कारखानदार यांतील संबंध बिघडत गेले. त्यात जागतिकीकरणामुळे बाहेरच्या देशातील उत्पादने अत्यंत कमी किमतीत येऊ लागल्यापासून येथील कंपन्यांना आपल्या मालाची किंमत कमी करावी लागली. परमनंट कामगारांना भरमसाट पगार देण्याऐवजी कमी पैशात कंत्राटी कामगार ठेवू लागले. स्वत:च्या कामगारांना काम न देता बाहेरील कंत्राटदारांना कामे देऊन पार्ट उत्पादने (जुळणी, पिंट्रिंग, इतर प्रक्रिया व पॅकिंग इत्यादी) त्यांच्याकडून करून घेऊ लागले. मग कंपनीतील रिकाम्या कामगारांना बसून पगार का द्यायचा, म्हणून कामगार कपात आली. आणि सरतेशेवटी व्ही.आर.एस. देऊन कंपनी बंद करण्याचे मनसुबे मालक आखू लागले. कामगारांच्या फायद्यासाठी अवास्तव मागणी करून संप करणाऱ्या नेत्यांना जागतिक अर्थकारणाची दिशा ओळखता आली नाही. कंपनी मालकांचे यात काही नुकसान होत नव्हते. सरकारचा टॅक्स वाढला, इतर खर्च वाढले, तरी ते कमी किमतीत कंत्राटी पद्धतीने कामे करून आपल्या खिशाला तोशीस पडू देत नव्हते. परिणामी हळूहळू कंपन्या बंद पडू लागल्या. याचा जास्त फटका गिरणी कामगारांना बसला. ठाण्यातील रेमंडसह, कॅसल मिल, मॉडेला, न्यू शक्ती डाय वर्क, किरण मिल, कृष्णा वुलन मिल, सेंच्युरी स्पिनिंग अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, वेलमन टेक्स्टाइल इत्यादी कंपन्या १९९५-९६ पर्यंत बंद पडल्या. कपडा उद्योगाबरोबरच होल्टास, जे. के. केमिकल, सीम टूल, वायमन गार्डन, एक्सोलो, इनारको, फ्यूएल इंजेक्शन, शहा मॅलिएबल, गरवारे पेंट या घोडबंदर रोडला असणाऱ्या सर्व कंपन्या बंद पडल्या. आज त्या जागी मोठमोठे मॉल, हाऊसिंग कॉम्प्लेक्स, उंचच उंच टॉवर उभे राहिले आहेत.
येथून तेथून कामगार हा एकच आहे. राष्ट्रउभारणीत कामगारांच्या श्रमाचे मोल खूप मोठे आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १ मे हा जागतिक कामगार दिन. त्यानिमित्त हा सारा लेखनप्रपंच.
सदाशिव टेटविलकर