ठाणे – राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त आणि एकवीस ते पासष्ठ वर्ष वयोगटात न बसणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते. यानंतर आता अशा लाभार्थ्यांची नावे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून यादीतून वगळण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र आता घरात तीन महिला असताना कोणत्या एका महिलेचे नाव वगळायचे यासाठी अंगणवाडी सेविकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
काही कुटुंबांमध्ये सासूचे नाव ठेवायचे की सुनांचे यावरून देखील चांगलीच पंचायत होत असल्याचे अनुभव काही अंगणवाडी सेविकांनी लोकसत्ताशी संवाद साधताना सांगितले. ठाणे जिल्ह्यात तब्बल १ लाख १३ हजार ३९ लाभार्थ्यांनी एकाच रेशन कार्डवर दोनपेक्षा जास्त सदस्यांमार्फत या योजनेचा लाभ घेतल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने राबवलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये आर्थिक मदत देऊन त्यांच्या घरगुती खर्चाला हातभार लावणे, स्वावलंबनाची गोडी लावणे आणि आर्थिक सुरक्षितता प्रदान करणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात लाखो महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून, महिलांच्या जीवनात या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अलीकडेच एका घरातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतल्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहे. शासनाने अशा सर्व घटनांची पडताळणी करण्याचे आदेश दिले असून अंगणवाडी सेविका सध्या घराघरांत जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहेत. ठाणे जिल्ह्यातही हे सर्वेक्षण सुरु आहे.
या योजनेच्या निकषानुसार घरातील अर्थातच एकच रेशनकार्डवरील दोनच लाभार्थी महिलांना याचा लाभ द्यायचा आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये कुटुंबातील प्रत्यक्ष लाभ कोणत्या लाभार्थीला द्यायचा आणि कोणाचे नाव वगळायचे, याबाबत सेविकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण १३ लाख ९५ हजार ७४ लाभार्थी पात्र ठरले होते. मात्र, त्यापैकी तब्बल १ लाख १३ हजार ३९ लाभार्थ्यांनी एकाच रेशन कार्डवर दोनपेक्षा जास्त सदस्यांमार्फत या योजनेचा लाभ घेतल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. शासनाच्या नियमानुसार, प्रत्येक घरातून फक्त एकाच लाभार्थीला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
या वेळी प्रक्रियेत कुटुंबांची समजूत काढणे, कुटुंबातील मतभेद सोडवणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तरीही शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार काटेकोर सर्वेक्षण सुरू आहे. पुढील काही दिवसांत सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर योजनेतून कोणते लाभार्थी कायम राहतील आणि कोणाचे नाव वगळले जाईल, याबाबतची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. तर ज्यांची आर्थिक स्थिती खऱ्या अर्थाने कमकुवत आहे अशा कुटुंबांचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे काही अंगणवाडी सेविकांनी लोकसत्ताशी संवाद साधताना सांगितले.
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता व सद्यस्थितीत आपला लाभ बंद झाला आहे. अशा लाभार्थ्यांना अपात्र ठरवण्यापूर्वी आपली पात्रतेच्या निकषासंदर्भातील सर्व मूळ कागदपत्रे (रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्म दाखला, वयाचा पुरावा) पडताळणी करण्यासाठी आपल्या जवळील अंगणवाडी केंद्रातील सेविका अथवा मदतनीस यांच्याशी संपर्क साधावा. – नमिता शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, ठाणे