बदलापूर: शहापूर तालुक्यातील खर्डी जवळच्या उंबरखांड या गावात एका घरात रात्री दोनच्या सुमारास बिबट्या शिरला. पहाटेपासून स्थानिक वनविभाग, स्थानिक पोलीस आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पथकाकडून बिबट्याला बाहेर काढले जाते आहे. खर्डीच्या वनक्षेत्रपाल कार्यालयाने या बातमीला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा : क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या

संपन्न जंगल आणि बिबट्याच्या अधिवासासाठी सकारात्मक वातावरण तयार झाल्याने शहापूर तालुक्यातील खर्डी आणि त्याला लागून असलेल्या अभयारण्यांमध्ये बिबट्याचा अधिवास वाढतो आहे. ही सकारात्मक बाब असली तरी अनेकदा बिबट्या प्रवास करत असताना नागरी वस्तीतून जात असतात. काही वर्षांपूर्वी महामार्गावर अशाच बिबट्याचे अपघातही झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता शहापूर तालुक्यातील खर्डीजवळ उंबरखांड गावात एका घरात बिबट्या शिरल्याची माहिती समोर आली आहे. उंबरखांड गावातील लहू निमसे यांच्या घरात रात्री दोनच्या सुमारास बिबट्या शिरला. याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळच्या सुमारास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान याचे पथक बचाव कार्यासाठी उंबरखांड गावात दाखल झाले होते. सकाळी दहा वाजेपर्यंत हे बचाव कार्य सुरू होते, मात्र बिबट्याला बाहेर काढण्यात अद्याप यश आले नसल्याची माहिती खर्डीच्या वनक्षेत्रपालांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.