– भगवान मंडलिक / सागर नरेकर
बदलापूर. अंबरनाथ. कल्याण परिसरातील जंगलात गेल्या महिन्यापासून संचार करणाऱ्या बिबट्याने माथेरानच्या जंगलात प्रयाण केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पर्यटकांनाही माथेरानमध्ये भटकंती करताना सावध राहण्याचा इशारा देण्यात आलाय.

गेल्या दोन महिन्यांपासून मुरबाड. कल्याण. बदलापूर. अंबरनाथ परिसरातील जंगलात बिबट्याचा वावर आहे. बदलापूर डोंगर परिसरातील काही सोसायट्यांच्या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा संचारावर लक्ष केंद्रित केले आहे. काही दिवसापासून माथेरानच्या जंगलात बिबट्याचा वावर असल्याने बदलापूर परिसरातील बिबट्या या भागात आल्याची चर्चा सुरू आहे.

मागील तीन दिवसापूर्वी बिबट्याने माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर भागातील बेकरे गावात मध्यरात्री प्रवेश केला. त्याने संदेश कराळे या शेतकऱ्याच्या गोठ्यातील म्हशीवर हल्ला चढवला. म्हशीची तडफड सुरू होतच कराळे कुटुंब जागे झाले. त्यांनी गोठ्यात जाऊन पाहतच म्हशीवर बिबट्याने हल्ला चढवल्याचं दृष्य समोर दिसलं. कराळे कुटुंबीयांनी आरडाओरडा करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.

गेल्या तीन महिन्यापूर्वी कर्जत परिसरातील खांडस भागात बिबट्याचा वावर होता. या भागातील शेळ्या. कुत्र्यांचा फडशा रात्रीच्या वेळी बिबट्याने पाडला होता. कटके कुटुंबीयांच्या बकऱ्या या बिबट्याने खाल्या होत्या. बेकरे भागातील शेतकऱ्यांनी जंगलात चरायला सोडलेल्या बकऱ्या अचानक गायब झाल्या आहेत. बिबट्याने त्या फस्त केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कर्जत, माथेरान परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्यापासून मनुष्य, प्राणी यांना धोका होणार नाही याची काळजी वनविभागाकडून घेतली जात आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एखादा प्राणी मृत झाला असेल तर त्याच्यावर विषारी पावडर टाकू नका. मृत प्राण्याचे मास बिबट्याला खाऊ द्यावे. ज्या शेतकऱ्याचा पाळीव प्राणी बिबट्याचा हल्ल्यत मृत झाला असेल त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. असे कर्जत परिसराचे वनाधिकारी निलेश भुजबळ यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील १० ते १२ दिवसांपासून हा बिबट्या बदलापूर वनक्षेत्रातून गायब झाला होता. त्यामुळे त्याचे लोकेशन स्थानिक वन अधिकाऱ्यांना दिले जात नव्हते. १३ जानेवारीला शेवटचे त्याचे लोकेशन उल्हास नदी किनारी दिसले होते. त्यानंतर तो या भागात नव्हता, असं वन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.