कल्याण – गेल्या आठवड्यापासून शहापूर तालुक्याच्या विविध भागात बिबट्याचा संचार सुरू असल्याचे ग्रामस्थांना आढळून आले आहे. शेरे (शेई-वासिंंद) येथे बिबट्याने गेल्या आठवड्यात पाळीव श्वानाची शिकार केली होती. ही घटना ताजी असतानाच शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील सो-खरांगण भागात बिबट्याने एका श्वानाची शुक्रवारी शिकार केली आहे. त्यामुळे तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याने वनाधिकाऱ्यांनी या भागात जनजागृती मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा >>> ठाकुर्लीत ९० फुटी रस्त्यावरून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले, दुचाकीस्वारांच्या घिरट्या सुरू

खरांगण भागात शुक्रवारी रात्री बिबट्याने गाव परिसरातील एका श्वानाला फरफटत नेत गावाबाहेर शिकार केली आहे. बिबट्याच्या हालचाली गाव भागातील ग्रामपंचायतीने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. गावाजवळील जंगलात बिबट्या आल्याची माहिती मिळताच किन्हवली,सो, खरांगण, टाकीपठार भागात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या आठवड्यात शेरे गाव हद्दीत असलेला बिबट्या संचार करत किन्हवली, सो, खरांगण भागात आला असावा, असा प्राथमिक अंदाज वन अधिकाऱ्यांनी काढला आहे. शेई, शेरे, अंबर्जे, वासिंद, फळेगाव, लेनाड, शेंद्रुण, अल्याणी या भागात घनदाट जंगल, बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. त्यामुळे बिबट्याला भक्ष्य, पाणवठा उपलब्ध होत असल्याने तो या भागात संचार करत असावा, असेही अधिकाऱ्यांनी सांंगितले. खरांगण भागात बिबटया आल्याची माहिती मिळताच शहापूरचे उप वनसंरक्षक सचीन रेपाळ, धसई विभागाचे विभागीय वनाधिकारी दर्शन ठाकूर यांनी तातडीने खरांगण वनक्षेत्रात भेट देऊन स्थानिक वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षकांना या भागात गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>> गणपत गायकवाडांच्या नाराजीमुळे खासदार श्रीकांत शिंदे सावध, कल्याण पूर्वमध्ये विकासकामांचा धडाका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरांगण, शिरोशी, टोकावडे, सरळगाव भागातून पुढे माळशेज घाट परिसर, सह्याद्रीचा रांंगा आहेत. त्यामुळे जुन्नर परिसरातून आलेला बिबट पुन्हा आहे त्याच मार्गाने परतीच्या वाटेवर असण्याची शक्यता वन्यजीव क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करत आहेत. गाव परिसरात बिबट्या आढळून आला तर घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती गावांमध्ये वन विभागाचे अधिकारी देत आहेत.