‘आणखी पु. ल.’चे शनिवारी प्रकाशन
आपल्या लेखनाबद्दल मराठी सारस्वताच्या दरबारात दबदबा असलेल्या आणि गुरुस्थानी असलेल्या बा. सी. मर्ढेकर यांच्याकडून शाबासकी मिळणे, हा भाग्ययोग वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या वर्षी पु. ल. देशपांडे यांच्या पत्रिकेत होता. त्यामुळे १९५१मध्ये त्रिचनापल्लीहून मर्ढेकरांनी पुलंना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘त्यांचे व्यवच्छेदक लक्षण’ वाचून आम्ही खरोखर बेहद खूश आहोत, तुमच्या लेखणीवर. हे पत्र म्हणजे या दोघांमधील एक अनोखा संवाद आहे.
या आणि अशा अनेकविध साहित्याचा समावेश असलेल्या ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकाचे प्रकाशन येत्या शनिवारी, दि. ३० रोजी ठाण्यात होत आहे. ‘लोकसत्ता’तर्फे प्रकाशित होत असलेल्या या अंकाबद्दल वाचकांमध्ये कमालीचे औत्सुक्य निर्माण झाले आहे. यानिमित्त ‘शब्दवेध’ निर्मित ‘अपरिचित पु. ल.’ या साहित्य संगीतमय कार्यक्रमाचेही खास आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रथम येणाऱ्यास प्राधान्य यानुसार सर्वासाठी खुला आहे.
कविवर्य बा. सी. मर्ढेकर हे पुलंना इस्माइल कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यानंतर काही काळाने पु ल आणि मर्ढेकर रेडिओवर काही दिवस एकत्र कामसुद्धा करत होते. बालकवींची फुलराणी ही पुलंची आवडती कविता. या कवितेचे इंग्रजी भाषांतर करण्याची विनंती पुलंनी मर्ढेकरांना केली होती. त्याच्या उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात मर्ढेकरांनी पुलंचीही छान ‘फिरकी’ घेतली. त्यांनी लिहिले, ‘पत्र वाचून धस्सं झालं अगदी. म्हणे ‘घराणे’ एक. तेव्हा ‘फुलराणी’चे इंग्रजी भाषांतर करा. अहो इथे एक ओळ लिहिता डोळ्याची बुब्बुळे फिरतात अन् प्राध्यापक महाशय म्हणतात भाषांतर करा. उद्या ज्योत्स्नाबाई पुण्यात राहतात आणि आम्हीही मधून मधून पुण्याला जातो म्हणून तुम्ही सांगाल जरा त्यांच्या गाण्याला तंबोरा धरा म्हणून. वा, महाराज आम्ही नव्य कव्य झालो तरी अगदीच हॅ हॅ हॅ नाही म्हटलं, असं आम्ही बनणार नाही बरं का!’
आणखी आकर्षण..
‘अपरिचित पु.ल.’ या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी आणि सुनील अभ्यंकर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी नरेंद्र भिडे यांनी संगीत संयोजन केले आहे. पुलंच्या साहित्यातील अनेक अपरिचित पैलूंचे दर्शन साहित्य वाचन आणि संगीताच्या माध्यमातून पोहोचवणारा हा कार्यक्रम हेही या प्रकाशन समारंभाचे वेगळे आकर्षण आहे.
’केव्हा – शनिवार, दि. ३० नोव्हेंबर
’कुठे – हॉटेल टिपटॉप प्लाझा,
एलबीएस रोड, ठाणे (पश्चिम )
’किती वाजता – सायंकाळी साडेसहा वाजता
मुख्य प्रायोजक – परांजपे स्कीम्स
सहप्रायोजक – चितळे बंधू मिठाईवाले, स्टोरीटेल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.