कर्ज फेडणाऱ्या ३०० पैकी २२५ जणांना पुन्हा कर्ज वाटप

ठाणे : केंद्र शासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने फेरीवाल्यांच्या व्यवसायाच्या वृध्दीसाठी कर्ज योजना राबविण्यात येत असून त्या अंतर्गत ठाणे महापालिकेने शहरातील ५ हजार २२६ फेरीवाल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे कर्ज वाटप केले होते. त्यापैकी केवळ तीनशे फेरीवाल्यांनी केली कर्जाची परतफेड केली असून उर्वरित ४ हजार ९२६ जणांनी कर्जाची परतफेड केली नसल्याची बाब समोर आली आहे. तसेच कर्ज फेडणाऱ्या तीनशे जणांपैकी २२५ जणांना पालिकेने पुन्हा २० हजार कर्ज देऊ केले आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली.

केंद्र शासनाकडून फेरीवाला धोरणा अंतर्गत फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार रुपये कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ही योजना सुरु करण्यात आली होती. फेरीवाल्यांच्या व्यावसायात  वृध्दी व्हावी यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ठाणे महापालिकेने फेरीवाल्यांकडून कर्ज घेण्यासाठी अर्ज मागविले होते. शिवाय ही योजना यशस्वी करण्यासाठी पालिकेने नगरसेवकांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात शिबिरांचे आयोजन केले होते. दोन वर्षांपूर्वी करोना काळात महापालिकेच्या उत्पन्न वसुलीवर परिणाम झाला होता. तरीही या संकटाच्या काळात फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने या कर्जाचे वाटप करण्यात आले होते. या योजनेसाठी ७ हजार २१९ फेरीवाल्यांनी अर्ज केले होते. त्यातील ५२२६ फेरीवाल्यांना १० हजार या प्रमाणे कर्ज वाटप करण्यात आले होते. त्यापैकी केवळ तीनशे फेरीवाल्यांनी कर्ज फेड केली असून उर्वरित ४ हजार ९२६ जणांनी कर्जाची परतफेड केली नसल्याचे समोर आले आहे. कर्ज फेडणाऱ्या तीनशे जणांपैकी २२५ जणांना पालिकेने दुसऱ्या टप्प्यात २० हजार कर्ज देऊ केले आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. या योजनेत १० हजार रुपये कर्ज घेतल्यानंतर ते एक वर्षाच्या आत परत फेडणे अपेक्षित होते. तरीही ४ हजार ९२६ जणांनी कर्जाची परतफेड केली नसून त्यांच्याकडून पालिका कर्जाची रक्कम कशी वसूल करणार, याबाबत मात्र समजु शकलेले नाही. तसेच कर्जाची रक्कम फेडणाऱ्या फेरीवाल्यांना टप्याटप्याने वाढीव रक्कमेचे कर्ज देण्यात येत असून यामुळे  उर्वरीत फेरीवाले कर्जाची परतफेड करतील असे पालिकेच्या संबधींत विभागाने स्पष्ट केले आहे. तिसऱ्या टप्यात ५० हजारांचे कर्ज वितरीत केले जाणार असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.