कल्याण- दिवाळी सणाच्या काळात कल्याण डोंबिवली पालिकेकडून डोंबिवली पश्चिमेतील एकमेव प्रशस्त भागशाळा मैदान प्रशासनाकडून मनोरंजन कार्यक्रमांना २० दिवस भाड्याने देण्यात येते. या कालावधीत मैदानात फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, विविध प्रकारचे खेळ खेळणाऱ्या खेळाडुंची कुचंबणा होते. लहान मुलांना मौजमजेसाठी मैदान उपलब्ध राहत नसल्याने यावेळी भागशाळा मैदान मनोरंजन, उत्सवी कार्यक्रमांसाठी पालिकेने देऊ नये अशी मागणी डोंबिवलीतील नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा >>> ठाणे एसटीकडून दिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी खास सोय; १५ ते ३० ऑक्टोबर दरम्यान धावणार २० जादा बसेस

यासंदर्भात नागरिक, खेळाडुंनी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भागशाळा मैदानाचे व्यापारीकरण करू नका. नागरिकांना सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी एकतरी मैदान उपलब्ध ठेवा, अशी मागणी नागरिकांनी पालिकेकडे केली आहे. या मागणीचे सविस्तर निवेदन लवकरच नागरिकांकडून पालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे. दिवाळी सण येण्यापूर्वी काही कार्यक्रम संयोजक भागशाळा मैदान एक महिना अगोदर पालिकेकडे नोंदणीकृत करुन ठेवतात. यावेळी नागरिकांनी अशा कार्यक्रमांना कडाडून विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

मैदानात उत्सव भरविण्यात येत असल्याने दररोज संध्याकाळी चार ते रात्री १० वाजेपर्यंत वाहने, नागरिकांच्या वर्दळीमुळे परिसरात धुरळा उडतो. मैदानाच्या चारही बाजुने उत्सावासाठी येणारे नागरिक वाहने उभी करुन ठेवत असल्याने या भागात वाहन कोंडी होते. परिसरातील सोसायटीतील रहिवाशांना या कोंडीचा सामना करावा लागतो, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. डोंबिवली पश्चिमेत भागशाळा एकमेव मध्यवर्ती मैदान आहे. या मैदानात मनसेचे डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रल्हाद म्हात्रे यांनी आसन, मैदान, खेळपट्टी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सुविधांमुळे नागरिक दररोज पहाटे चार वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मैदानात फिरण्यासाठी, खेळण्यासाठी येतात. लहान मुले आजी आजोबांसोबत याठिकाणी बागडण्यासाठी येतात. मैदान पालिकेकडून १५ ते २० दिवस उत्सवासाठी देण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू असल्याची कुणकुण लागताच जागरुक नागरिकांनी भागशाळा मैदानाचे व्यापारीकरण करू नका अशी मोहीम डोंबिवलीत सुरू केली आहे. दरम्यान, पालिका अधिकाऱ्याने याविषयी माहिती घेऊन सांगतो, असे सांगितले.

गेल्या वर्षी नागरिकांच्या आक्रमक विरोधाने उत्सव संयोजकांना कार्यक्रम गुंडाळावा लागला होता. भागशाळा मैदानात खेळण्या, बागडण्याच्या सुविधा असल्याने बालगोपाळ ते वृध्द मंडळी सकाळपासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत येतात. ज्येष्ठ नागरिकांचे कट्टे भरतात. त्यामुळे पालिकेने नागरिकांची गैरसोय करुन उत्सव कार्यक्रमांसाठी देऊ नये. अशा कार्यक्रमांसाठी पालिकेकडे अनेक मैदाने आहेत. त्याचा वापर करण्यात यावा.

प्रल्हाद म्हात्रे अध्यक्ष मनसे डोंबिवली विधानसभा क्षेत्र

भागशाळा मैदानात दोन दिवसाचा कार्यक्रम असला तर नागरिकांना काही वाटत नाही. मैदान सलग २० दिवस एखाद्या संस्थेला देऊन तेथे उत्सव कार्यक्रम होत असतील तर यामध्ये नागरिकांची गैरसोय, परिसरातील रहिवाशांना त्रास होतो. याची जाणीव पालिकेने ठेऊन भागशाळा मैदान कोणत्याही संस्थेला मनोरंजन उपक्रमासाठी देऊ नये.

समीर चिटणीस सरचिटणीस  भाजप पश्चिम मंडल