कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी कचरा क्षेपणभूमीमुळे येथील स्थानिकांना उग्र वासाचा सामना करावा लागतो. उग्र वासामुळे नाक मुठीत घेऊन जगत असतानाच आता या कचऱ्याला लागणाऱ्या आगीच्या धुराने या परिसरातील रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. सकाळ-संध्याकाळ येथील कचरा अचानक पेट घेतो आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या त्रासाने नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहेत.
कल्याण पश्चिमेकडील आधारवाडी परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची कचरा क्षेपणभूमी आहे. कल्याण-डोंबिवली क्षेत्रातून दररोज गोळा होणारा कचरा याच ठिकाणी टाकला जातो. या परिसरात लोकवस्ती, तसेच याला लागूनच सोनावणे महाविद्यालय आहे. कचरा क्षेपणभूमीमधील कचऱ्याच्या उग्र वासामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाक मुठीत धरूनच जावे लागत आहे. आधीच या वासामुळे त्रस्त असलेल्यांना आता या ठिकाणी कचऱ्याला आग लागल्यावर निर्माण होणाऱ्या धुराचा त्राससुद्धा सहन करावा लागतो आहे. आधारवाडी येथील कचरा क्षेपणभूमीमध्ये नेहमीच छोटय़ा-मोठय़ा आग लागण्याच्या घटना घडत असतात. लहान मुले येथे खेळत असतात. त्यांना या आगीचा धोका निर्माण होऊ शकतो.  या कचरा क्षेपणभूमीची क्षमता संपली असल्याने येथे आता कचरा टाकण्यात येऊ नये, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्देश दिले आहेत. मात्र तरीही कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कचरा आधारवाडी क्षेपणभूमीतच टाकला जात आहे. यामुळे येथील नागरिक पुरते हैराण झाले आहेत.