२२ नोव्हेंबर २०१६. मोना चॅटर्जी (१७) ही बारावीत शिकणारी तरुणी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकात उतरली. अरुणालच प्रदेशातून ती आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईत आली होती. मुंबईत येण्याचे कारण काय तर येथे राहत असलेल्या आपल्या प्रियकरला भेटणे. फेसबुकवरून तिची ओळख अरुण कुमार या तरुणाशी झाली होती. अरुण कुमारने तिला मुंबईत येऊन भेटण्याची गळ घातली होती. दोन दिवस मुंबई राहून ती परतणार होती. अरुण तिला घ्यायला रेल्वे स्थानकात येणार होता. त्यामुळे अडचण नव्हती. परंतु मुंबईत एक भीषण वास्तव मोनाच्या स्वप्नाचा चुराडा करणार होता याची तिला कल्पना नव्हती.

मोना ही चांगल्या घरातील मुलगी होती. बारावी विज्ञान शाखेत ती शिकत होती. चांगले शिक्षण मिळावे म्हणून तिला अरुणाचल प्रदेशमधीलच मोहक जिल्ह्य़ातील मुलींच्या वसतिगृहात (हॉस्टेल) ठेवले होते. गेल्या वर्षी तिची अरुण कुमार शी फेसबुकवर ओळख झाली. अरुण कुमार हा दिसायला देखणा होता. त्याचा मुंबईत वस्तू निर्यातीचा व्यवसाय होता. त्याच्या रूपावर ती भाळली आणि वर्षभरापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. माझा मुंबईत मोठा बंगला आहे. दोन दिवस तरी भेटायला ये, असा आग्रह त्याने केला होता. मोनाने आपले सामान, पैसे घेतले आणि मुंबईला आली. तिला न्यायला आलेल्या अरुणला पाहताच तिचा चेहरा उतरला. कारण छायाचित्रात दिसणारा देखणा अरुण नव्हता. हा एक सर्वसाधारण तरुण होता. अरुणने फेसबुकवर दुसऱ्याचे छायाचित्र लावलेले होते. नाराज झालेल्या अरुणने तिची क्षमा मागितली आणि वेळ मारून नेली. मोनानेही मग प्रेमापोटी त्याकडे दुर्लक्ष केले.

अरुण गाडीतून तिला आपल्या घरी जायला निघाला. माझ्या मोठय़ा बंगल्यात राहू, असे अरुण तिला सांगत होता. पण गाडी एका बकाल वस्तीतल्या चाळीत येऊन थांबली. अरुण हा कुठला व्यावसायिक नव्हता. त्याने मोनाला फसवले होते. आपली फसवणूक झाल्याचे मोनाला समजले. अरुणने मोनाला एका खोलीत नेऊन डांबले. त्या अनोळखी ठिकाणी मोनाला काहीच प्रतिकार करता आला नाही. अरुणने सावज टिपले होते. त्या खोलीत अरुण तिच्यावर लैंगिक अत्याचार करू लागला.

हॉस्टेलमधून दर दोन-तीन दिवसांनी मोनाचा फोन यायचा. पण आठवडा झाला तरी मोनाचा फोन आला नाही म्हणून तिच्या पालकांनी संपर्क केला, तेव्हा समजले की मोना हॉस्टेलमधून घरी जाण्यासाठी निघून गेली होती. तिच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. मोनाचा फोन बंद होता. ती कुठे गेली काहीच माहिती नव्हती. त्यांनी ताबडतोब स्थानिक पोलीस ठाणे गाठले. २८ नोव्हेंबरला मोना बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. मोनाचे कुटुंबीय प्रतिष्ठित घराणे होते. अरुणाचलच्या पोलीस महासंचालकांनी दिल्ली येथील सहपोलीस आयुक्तांची मदत मागितली आणि तपासाची चक्रे सुरू झाली. पण मोनाचा काहीच पत्ता लागत नव्हता.

अरुणच्या फसव्या प्रेमजाळात अडकलेल्या मोनाचे आयमुष्य नरकाप्रमाणे झाले होते. अरुण तिला खोलीत कोंडून जात होता. तिच्यावर तो सतत बलात्कार करत होता. तिला या भागाची काहीच माहिती नव्हती. जर पळायचा प्रयत्न केलास किंवा बाहेर जाऊन मदत मागितली तर तुला वेश्याव्यवसायत विकून टाकेन, अशी त्याने धमकी दिली होती. एकदा तिने नकळत अरुणच्या मोबाइलवरून आपल्या घरी फोन केला. मी मुंबईत आहे, पण कुठे ते माहीत नाही. मी फसले आहे. मला सोडवा असेच ती बोलली. मला खिडकीतून एक आंब्याचे झाड आणि एक दवाखाना दिसतोय. एवढेच ती म्हणाली.

तिच्या पालकांनी ही माहिती दिल्ली पोलिसांना दिली. दिल्ली पोलिसांनी मुंबईच्या समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण पाटील यांच्याकडे याप्रकरणी मदत मागितली. आंब्याचे झाड आणि दवाखाना या दुव्यावरून मुलीला शोधणे अशक्यकोटीतले आव्हान होते. साहाय्यक आयुक्त अरविंद सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गिड्डे, पोलीस निरीक्षक प्रवीण कदम यांचे पथक कामाला लागले. पोलिसांनी ज्या क्रमांकावरून फोन आला त्याचे टॉवर लोकेशन तपासले. ते होते रेहमत नगर. मुंबईत रेहमत नगर नव्हते. मग पोलिसांनी ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आदी ठिकाणी तपास केला. नवी मुंबईच्या कळंबोली येथे रेहमत नगर होते. पण एवढय़ा मोठय़ा वस्तीतून तिला शोधायचे कसे हे आव्हान होते. फोनवरून त्यांनी आंब्याचे झाड आणि दवाखाना असल्याची खूण सांगितली होती. पोलिसांनी परिसरातले सर्व छोटे-मोठे दवाखाने आणि त्याच्यासमोर आंब्याचे झाड आहे का, त्याचा शोध सुरू केला. स्थानिक खबऱ्यांना कामाला लावले.

दरम्यान, तिच्या पालकांना एक फोन आला. तुमची मुलगी सुखरूप हवी असेल तर तिच्या बँक खात्यात ५०,००० रुपये टाका. त्यानुसार पोलिसांनी त्या बँक खात्यावर रक्कम टाकली. ते खाते पनवेल येथील होते आणि फोनही त्याच भागातून होता. पोलिसांना सर्व दुवे जुळवून तपासाची दिशा ठरवली. पोलिसांनी बँकेच्या बाहेर सापळा लावला. एक तरुण ते पैसे घेण्यासाठी आला. पोलिसांनी त्याला पकडले. एका प्रकरणात जमिनीच्या दलालीचे हे पैसे असल्याचे त्याने सांगितले. अरुणविषयी काही माहीत नसल्याचे त्याने सांगितले. अरुणने पद्धतशीरपणे हे पैसे मिळवले होते.

पोलिसांनी आंब्याच्या झाडाचा शोध सुरूच ठेवला होता. ७ डिसेंबरला त्यांना कळंबोलीच्या रेहमत नगर येथे दवाखाना आणि आंब्याचे झाड असलेली जागा सापडली. पोलिसांनी लगेच तेथील सर्व चाळी शोधून काढल्या. एका खोलीला कुलूप होते. कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. त्यांना भेदरलेल्या अवस्थेतील मोना दिसली. पोलिसांनी त्या भागात सापळा लावून अरुणलाही अटक केली. तो ठकसेन आणि मुलींना वेश्याव्यवसायात ढकलणारा दलाल होता. यापूर्वी त्याने फेसबुकवरून दोन मुलींना अशाच पद्धतीने सावज बनविले होते. पोलिसांनी अरुणला अपहरण, बलात्कार, पोक्सो आदी प्रकरणांत अटक केली. मोनाला तिच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.