‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेत तज्ज्ञांचा सल्ला

दहावी-बारावीनंतर महत्त्वाच्या शैक्षणिक टप्प्यात पर्दापण करताना अनेक जण विविध प्रकारचा अभ्यास करून क्षेत्र निवडतात. कोणतेही क्षेत्र निवडले तरी संयम, सातत्य आणि मेहनत हीच करिअरच्या यशाची गुरुकिल्ली आहे, हे लक्षात ठेवण्याचा सल्ला विविध तज्ज्ञांनी गुरुवारी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यशाळेत दिला. ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे पार पडलेल्या दोनदिवसीय कार्यशाळेची सांगता गुरुवारी झाली. या कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:चे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेताना संयम हवा, मेहनत करण्याची तयारी असली पाहिजे, असे डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितले. ‘वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या संधी’ याविषयी डॉ. अमोल अन्नदाते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सेवाभावी वृत्ती हा या क्षेत्रातील महत्त्वाचा घटक आहे. पैसे कमावण्यासाठी या क्षेत्रात प्रवेश घेऊ नये, असे स्पष्ट मत डॉ. अन्नदाते यांनी व्यक्त केले.

‘करिअरच्या वेगळ्या वाटा’ या सत्रात विविध तज्ज्ञांनी उपस्थितांशी संवाद साधला. समाजमाध्यमे ही फक्त मनोरंजनापुरती मर्यादित राहिली नसून आता त्यांच्याकडे एक व्यवसाय म्हणून बघितले जात आहे. या माध्यमातून ब्लॉगर्सचे चांगल्या रीतीने अर्थार्जन होत आहे. या क्षेत्रातील अनेक संधीचा फायदा अधिकाधिक तरुणांनी घेतला पाहिजे, असा सल्ला समाजमाध्यमांवर ‘इन्फ्लुएन्सर’ असणाऱ्या ब्लॉगर प्रिया आडिवरेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. समाजमाध्यमांचा उपयोग करून जास्त क्रियाशील राहता येते. त्यासाठी डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देणारे अनेक वर्ग समाजमाध्यमावर उपलब्ध आहेत. त्यांचे प्रशिक्षण घेऊन या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळू शकते. या करिअरसाठी पालकांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. या क्षेत्रात काम करायला लागल्यानंतर दररोज काही तरी नवीन शिकले पाहिजे, त्याने जगातील नवीन ट्रेण्ड्सची माहिती मिळेल, असे प्रिया यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

लेखन क्षेत्र हे सुद्धा उत्तम आणि पूर्णवेळ करता येईल, असे करिअर आहे. या करिअरसाठी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे असे सचिन दरेकर यांनी सांगितले. ‘लेखनातील करिअर’ विषयावर दरेकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रा. नारायण राजाध्यक्ष यांनी ‘विधी शिक्षणातील संधी’विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. करिअर समुपदेशक विवेक वेलणकर ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ या विषयावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली. ‘टेलिव्हिजनवरील पत्रकारिता’ या विषयावर ‘एबीपी माझा’च्या पत्रकार ज्ञानदा कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. करिअरविषयक मिळालेला मूलमंत्र जाणतानाच सभागृहाबाहेर विविध अभ्यासक्रमांची माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली होती.

या कार्यशाळेचे टायटल स्पॉन्सर ‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स’ असून सहप्रायोजक ‘ विद्यालंकार क्लासेस’ आहेत. एनएमआयएमएस स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, एज्युकेशन ओव्हरसीज, सासमिरा, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट, युक्ती, द रिलायबल अकॅडमी आणि सिम्बॉयसिस स्किल अ‍ॅण्ड ओपन युनिव्हर्सिटी हे पॉवर्डबाय पार्टनर्स असून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकिग पार्टनर आहेत.

मुंबईत १४, १५ जूनला कार्यशाळा

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ ही कार्यशाळा आता दादर येथे होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत उपस्थित राहण्याची संधी मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी होता येईल. या कार्यशाळेच्या प्रवेशिका ८ जूनपासून उपलब्ध होणार आहेत.

कधी? -शुक्रवार, १४ जून आणि शनिवार, १५ जून रोजी  वेळ – सकाळी ९.३० वाजता

कुठे?  – रवींद्रनाथ नाटय़मंदिर, प्रभादेवी, मुंबई.