‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यक्रमाचे वसईच्या स्वामीनारायण मंदिराच्या सभागृहात आयोजन; विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
करिअर निवडीचा नेमका निकष कोणता, हे जाणून घेण्यासाठी दहावी-बारावीचे विद्यार्थी कमालीचे उत्सुक असतात. त्यासोबतच दहावी-बारावीनंतर नेमका कुठला अभ्यासक्रम निवडावा आणि त्या अभ्यासक्रमाचे नेमके स्वरूप कसे असते, तसेच त्यातील विविध करिअरसंधी कोणत्या.. अशा प्रश्नांनी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात ठाण मांडलेले असते. अशा करिअरविषयक अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला शनिवार, १६ जानेवारी रोजी वसई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या परिसंवादात नक्कीच मिळतील. हा परिसंवाद सर्वासाठी खुला आहे.
एसआरएम युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि रोबोमेट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा परिसंवाद येत्या शनिवारी, सायंकाळी पाच वाजता वसईच्या स्वामीनारायण मंदिरचे सभागृह, दुसरा मजला, आयडीबीआय आणि देना बँकेच्या वर, ६० फूट रोड, अंबाडी रोड, वसई (प.) येथे आयोजित करण्यात आला आहे.
पहिल्या सत्रात करिअर समुपदेशक विवेक वेलणकर हे दहावी-बारावीनंतरच्या कला, वाणिज्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक अभ्यासक्रमांच्या पर्यायांची ओळख करून देतील. अभियांत्रिकी विद्याशाखेतील विविध विद्याशाखा, प्रवेशपरीक्षा, प्रवेशपद्धती यांवरही ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
त्यानंतर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांचे ‘वैद्यक क्षेत्रात करिअर घडविताना..’ या विषयावर व्याख्यान होईल. वैद्यकीय शिक्षणाचे विविध पर्याय व त्यातील करिअरविषयक संधींविषयी डॉ. सुपे मार्गदर्शन करतील.
परिसंवादाच्या शेवटच्या सत्रात ‘परीक्षेच्या उंबरठय़ावर..’ याविषयी शैक्षणिक सल्लागार मिथिला दळवी विद्यार्थी-पालकांशी संवाद साधणार आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा तसेच अभ्यासतंत्रे याविषयी त्या उपस्थितांना मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांना करिअरविषयक दिशा देण्याचे काम या कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.

कधी ? – शनिवार, १६ जानेवारी रोजी. वेळ- सायं. ५ वाजता
कुठे? – स्वामीनारायण मंदिरचे सभागृह, दुसरा मजला, आयडीबीआय आणि देना बँकेच्या वर, ६० फूट रोड, अंबाडी रोड, वसई (प.).

मार्गदर्शक व त्यांचे विषय
वैद्यक क्षेत्रात करिअर घडविताना..- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.
दहावी-बारावीनंतर विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांच्या पर्यायांची ओळख- विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक.
परीक्षेच्या उंबरठय़ावर..- मिथिला दळवी, शैक्षणिक सल्लागार.