जीवनात खरेदीचा आनंद हा काही औरच असतो. त्यातच खरेदी करताना आपल्याला बक्षीसही मिळत असतील तर तो आनंद द्विगुणित होत असतो, असे प्रतिपादन ठाण्याचे महापौर संजय मोरे यांनी मंगळवारी केले. ठाणे-कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईतील ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या बक्षीस वितरणाचे पहिले पुष्प मंगळवारी सायंकाळी ठाण्यातील महात्मा गांधी रस्त्यावरील रेमंण्ड शोरूममध्ये गुंफले गेले. त्या वेळी संजय मोरे बोलत होते. ‘का रे दुरावा’ या मालिकेत खडूस जावेची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री शीतल क्षीरसागर यादेखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

२३ जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’अंतर्गत ठाणे शहरातील दुकानांतून खरेदी करून कूपन भरणाऱ्या ग्राहकांतून निवडण्यात आलेल्या पहिल्या तीन दिवसांच्या
विजेत्यांना मंगळवारी सन्मानित करण्यात आले. या वेळी विजेत्यांना ‘वीणा वर्ल्ड’कडून गिफ्ट हॅम्पर, ‘रेमण्ड’कडून गिफ्ट
व्हाउचर, कलामंदिर आणि विष्णूजी की रसोई यांच्याकडून गिफ्ट, टायटन, वामन हरी पेठे अ‍ॅण्ड सन्स यांच्याकडून सोन्याचे नाणे आणि पैठण साडी अशी पारितोषिके देण्यात आली. ठाणे नौपाडा येथील रेमण्डच्या शोरूममध्ये रंगलेल्या या सोहळय़ात ‘फेस्टीव्हल’मधील भाग्यवान विजेत्यांसोबत त्यांचे कुटुंबियही जमले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला एखाद्या कौटुंबिक सोहळय़ासारखे रूप आले होते. महापौर संजय मोरे आणि अभिनेत्री शितल क्षीरसागर हे येथे दाखल होताच, उपस्थितांनी एकच जल्लोष केला. क्षीरसागर यांच्या अभिनयाचे कौतुक करण्यासोबतच त्यांच्या मालिकेतील ‘खडूस’ भूमिकेबाबत गोड तक्रारीही प्रेक्षकांनी केल्या.

स्वागतार्ह उपक्रम
ठाण्यासाठी मुख्य अंकासोबत सहदैनिक सुरू करून ‘लोकसत्ता’ने ठाणेकरांची यापूर्वीच मने जिंकली आहेत.‘शॉपिंग फेस्टिव्हल’सारखा ग्राहकोपयोगी उपक्रम राबवून ‘लोकसत्ता’ने ठाणेकरांसाठी बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ‘खरेदी करा आणि जिंका’ अशा स्वरूपाचा उपक्रम ठाण-कल्याणकरांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल.
संजय मोरे, महापौर, ठाणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाचकांशी जोडणारा उपक्रम..
‘लोकसत्ता’ने सुरू केलेला हा उपक्रम सामान्य वाचकांशी जोडणारा असा उपक्रम असून प्रत्येक दिवशी खरेदी करणाऱ्यांना मिळणार बक्षीस ही आनंददायीच गोष्ट आहे. ‘लोकसत्ता’ने त्यासाठी पाऊल उचलून अत्यंत चांगल्या पद्धतीने हा महोत्सव साजरा केला आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रमसुद्धा अधिक देखणा आणि वाचकांशी जोडून घेणारा असाच आहे.
शीतल क्षीरसागर, अभिनेत्री.