ठाणे येथील कोलबाड भागातील सिद्धिविनायक टॉवरच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या गॅसवाहिनीच्या स्फोटाला रिलायन्स जियोचे खोदकाम जबाबदार असल्याचा दावा महानगर गॅस कंपनीने मंगळवारी केला. कोलबाड भागातील सिद्धिविनायक इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ महानगर गॅसची वाहिनी गेली असून याच परिसरात रिलायन्समार्फत फोरजी सुविधेकरिता वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. सोमवारी रात्री या भागात रिलायन्सचे कामगार रस्ते खोदून त्यामध्ये वाहिनी टाकण्याचे काम करत होते. त्या वेळी महानगर कंपनीच्या गॅसवाहिनीला धक्का बसून ती फुटली. त्यामुळे गॅसचा स्फोट होऊन तेथे आग लागली. या घटनेची माहिती मिळताच महानगर कंपनीने या भागातील गॅसपुरवठा बंद केला, अशी माहिती महानगर कंपनीच्या प्रवक्त्याने दिली. ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागात रिलायन्स कंपनीचे रस्ते खोदून फोरजी सुविधेकरिता वाहिनी टाकण्याचे काम सुरू असून या घटनेच्या निमित्ताने ही कामे आता धोकादायक ठरत असल्याचे उघड झाले आहे.
शंभर घरांचा गॅस बंद
वाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी केलेल्या अडथळय़ामुळे सोमवारी रात्री दुरुस्ती पूर्ण करता आली नाही. त्यामुळे या परिसरातील शंभरहून अधिक घरांचा गॅसपुरवठा मंगळवारी सायंकाळपर्यंत बंद होता.