पाचपाखाडी भागात सुमारे ५०० कुटुंबांना फटका

ठाण्यातील पाचपाखाडी भागात बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वृक्ष तोडताना महानगर गॅसची वाहिनी फुटली. सायंकाळच्या वेळेत हा प्रकार झाल्याने सुमारे पाचशे घरांना याचा फटका बसला आहे. रात्री उशिरापर्यंत या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम महानगर गॅसकडून सुरू होते.

पाचपाखाडी भागातील सिद्धी गृहसंकुलाजवळ एक वृक्ष धोकादायक अवस्थेत होते. त्यामुळे येथील काही दुकानदारांनी जेसीबीच्या सहाय्याने या वृक्षाला तोडण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी रस्त्याकडेला असलेल्या महानगर गॅसच्या वाहिनीला जेसीबीचा धक्का लागून वाहिनी फुटली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, महानगर गॅस आणि ठाणे अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. महानगर गॅसची ही वाहिनी येथील सुमारे ५०० कुटुंबांना गॅसपुरवठा करते. सायंकाळच्या वेळेत हा प्रकार झाल्याने स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले.

दुरुस्तीचे काम सुरू

महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांकडून गॅस वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असून याचा फटका सुमारे ५०० कुटुंबांना बसल्याचे महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.