|| भगवान मंडलिक
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना, भाजपची तोडीस तोड ताकद असूनही पूर्व मतदारसंघातून सलग दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून येणारे गणपत गायकवाड यांनी भाजपशी जवळीक वाढवली आहे. मात्र, हा मतदारसंघ शिवसेनेने मागितल्याने युती झाली तरी येथे बंडखोरीचे मोठे आव्हान त्यांना पेलावे लागण्याची चिन्हे आहेत.
सामान्य, झोपडपट्टी आणि गेल्या काही वर्षांत वाढत्या नागरी वस्तीमुळे मध्यमवर्गीय असा संमिश्र विचार करणारा मतदार या भागात आहे. त्यामुळे अन्य पक्षांसोबत रिपब्लिकन, बहुजन विकास, वंचित आघाडी या पक्षांचाही काही भागात येथे जोर दिसून येतो. मागील १० वर्षे येथे गणपत गायकवाड यांची सद्दी राहिली आहे. मात्र, या मतदारसंघात विकासकामांची बोंबाबोंब आहे.
कल्याण पूर्वेचा पूर्ण क्षमतेने विकास करायचा असेल तर प्रस्थापित वतनदारीला आव्हान देण्याचे वारे या भागातील राजकीय पक्षांमध्ये आतापासूनच वाहू लागले आहे. मागील निवडणुकीत गायकवाड यांना शिवसेनेच्या गोपाळ लांडगे यांच्याविरोधात निसटता विजय मिळवता आला होता. मात्र, आता शिवसेनेने आग्रहाने या मतदारसंघाची मागणी केली आहे. शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करण्याचा इशारा आधीच दिला आहे. त्यामुळे या मतदारसंघात युती झाली तरी, पक्षांतर्गत विरोधकांना शमवण्याचे आव्हान युतीच्या उमेदवारापुढे असेल.
कल्याण पूर्वेत उड्डाणपुलाची गरज आहे. पालिकेच्या आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. तेथील रहिवाशांचे पुनर्वसन करून ते भूखंड बगिचा, मनोरंजन, समाजविकास मंदिर, व्यायामशाळा अशा प्रस्तावित कामांसाठी वापरण्यात येणार आहेत. – गणपत गायकवाड, अपक्ष आमदार, भाजप पुरस्कृत.
मतदार म्हणतात,
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात उपलब्ध लोकसंख्येप्रमाणे नागरी सुविधा नाहीत. त्यामुळे हा भाग नेहमी वाळीत टाकल्यासारखा वाटतो. या भागाचे नेतृत्व खासदार, आमदार, नगरसेवक करतात तरी विकासापासून हा भाग नेहमीच वंचित राहिला आहे. – राजेश गरिबे, सहसचिव, तिसाई नागरी पतपेढी
या भागातील लोकप्रतिनिधींनी या भागातील आरक्षित भूखंड विकसित करून नागरी सुविधा रहिवाशांना उपलब्ध करून दिल्या असत्या तर आता समस्यांचे डोंगर या भागात उभे राहिले नसते. ती जागा अतिक्रमणांनी वेढली गेली आहे. ही जागा मोकळी करून घेणे अवघड आहे. – आनंद गायकवाड, माहिती कार्यकर्ते