कल्याण-डोंबिवली संदर्भात निवडणूक आयुक्तांचे मत

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतून २७ गावे वगळताना सरकारने कोणताही अभ्यास केला नव्हता, असे स्पष्ट मत राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी येथे व्यक्त केले.
नांदेड जिल्ह्य़ातील ६१७ ग्रामपंचायत निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर सहारिया, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांच्या उपस्थितीत निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत सहारिया बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, तसेच घटनेतील तरतुदीनुसार मुदत संपण्यापूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक असते. कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक १२ नोव्हेंबरपूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार आयोगाची गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू होती. २००५ मध्ये आयोगाने मुदतीच्या सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीत हद्द बदलण्याचा निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले होते, पण राज्य सरकारने याबाबत आवश्यक तो अभ्यास केला नव्हता असे दिसते. त्यामुळे २७ गावे वगळता येणार नाहीत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्याची माहिती त्यांनी दिली.
नांदेड जिल्ह्य़ातील ६१७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. २ हजार ५६ मतदान केंद्रांवर ८ लाख ८४ हजार ९८५ मतदार मतदानाचा हक्कबजावणार आहेत. मतदानादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नऊ हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तयार करण्यात आला आहे. लोकसभा-विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी दक्षता घेणे गरजेचे असते. त्याबाबत जिल्हा यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. १ नोव्हेंबरला मतदान व ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.