दुष्काळाचे निमित्त
राज्यात दुष्काळ असो की पूरस्थिती असो, नैसर्गिक आपत्ती असो की मानवी घातपात.. कोणत्याही परिस्थितीत ५०-५० फुटी हंडय़ा चढवून डीजेच्या दणदणाटात दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या संघर्ष मंडळाचा दहीहंडी उत्सव यंदा रद्द केला आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीकडे पाहून हा निर्णय घेत असल्याचे आव्हाड यांनी जाहीर केले आहे. मात्र, दहीहंडीसह सर्वच सार्वजनिक उत्सवांबाबत न्यायालयाने आणलेले र्निबध, महापालिकेची उत्सवांसाठीची आचारसंहिता आणि सत्तेत नसल्याने बिघडलेले नियोजनाचे आर्थिक गणित या कारणांमुळे ‘संघर्ष’ने यंदा दहीहंडीची घागर उताणीच ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
रस्ते किंवा चौकात मोठमोठाले मंडप उभारून दरवर्षी लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट करत साजऱ्या केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवात जितेंद्र आव्हाड यांच्या ‘संघर्ष’ची दहीहंडी अग्रस्थानी आहे. ठाण्यातील पाचपाखाडी भागात लागणाऱ्या संघर्षच्या दहीहंडी उत्सवात आजवर सर्वच नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे पाहायला मिळते. डीजेंचा कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असल्याने परिसरातील इमारतींमधील रहिवाशांनी वेळोवेळी आव्हाडांच्या दहीहंडी उत्सवाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने ‘संघर्ष’ने या तक्रारींची फिकीर केली नाही. आव्हाडांच्या या उत्सवाला तर राज्य पर्यटन महामंडळाचे आर्थिक प्रायोजकत्वही लाभत आले आहे. या व्यतिरिक्त अन्य जाहिरातदार आणि प्रायोजक यांच्या जोरावर संघर्षच्या दहीहंडी
उत्सवाचा काही कोटींचा खर्च भागत आला आहे. मात्र, राज्यात आता सत्ताबदल झाल्याने पर्यटन महामंडळासारख्या संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी आव्हाडांना बराच संघर्ष करावा लागणार होता. त्यातच उच्च न्यायालयाने उत्सवांच्या आयोजनाबाबत आखून दिलेली मार्गदर्शक तत्त्वेही ‘संघर्ष’च्या दहीहंडीच्या आड येत होती. या पाश्र्वभूमीवर आव्हाड यांनी यंदा दहीहंडी उत्सव न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे करताना राज्यातील दुष्काळामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे अधिकृत कारण आव्हाड यांनी दिले आहे.
कारण दुष्काळाचे
‘राज्य सरकार उदासीन आहे. थरांची मर्यादा, मंडपबंदी यामुळे उत्सव होतील की नाही, याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे. त्यातच राज्य सरकारला या दुष्काळग्रस्तांबाबत कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नाही. सरकारकडून अद्यापही शेतकऱ्यांना अर्थसाह्य़ जाहीर करण्यात आलेले नाही. तसेच, कर्जमाफीचाही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे उत्सव साजरा करणार नाही,’ अशी भूमिका आव्हाड यांनी मांडली आहे. त्याच वेळी उत्सवात येणारा खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
‘संघर्ष’ कोठे ढेपाळला?
’यापूवीं ठाणे शहरातील उत्सवांना रस्त्याच्या एकूण रुंदीपैकी निम्म्या जागेत मंडप उभारण्याची परवानगी दिली जात होती. पाचपाखाडी भागात तर ‘संघर्ष’चा मंडप संपूर्ण रस्ता व्यापत असे.
’मात्र, न्यायालयाने उत्सवांच्या आयोजनाबाबत कठोर भूमिका स्पष्ट केल्यानंतर ठाणे महापालिकेने नुकतीच नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार एकूण रस्त्याच्या एक चतुर्थाश भागातच मंडप उभारण्याची परवानगी देण्यात आली.
’आव्हाडांचा उत्सव ज्या रस्त्यावर साजरा होतो, त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी १५ मीटर इतकी आहे. नव्या नियमानुसार, त्यांना केवळ पाच मीटर रुंदीचा मंडप उभारण्याची परवानगी होती.
’याशिवाय दहीहंडीच्या उंचीवरील र्निबध आणि बालगोविंदांवरील बंदी यामुळे उत्सवातील भपकेबाजपणा कमी होण्याची शक्यता होती. या पाश्र्वभूमीवर ‘संघर्ष’ला दहीहंडी उत्सवच रद्द करण्याची वेळ आली.
सण साजरे करा,
पण चांगल्या प्रकारे..
राजकीय हस्तक्षेपा शिवाय कोणताही सण आनंदाने साजरा झाला पाहिजे, मात्र त्यांचा अन्य कोणालाही त्रास होता कामा नये. दुष्काळाची समस्या अधिक गंभीर असूनकडे लक्ष देऊन कोणी हा उत्सव साजरा करत नसेल तर ते स्वागताहार्य आहे. समाजात अनेक समस्या असून उत्सवांमुळे सुध्दा नागरिकांना त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ‘सण साजरा करू नका’ असे आमचे म्हणणे नसून सण सगळ्यांना आनंद देईल अशा पध्दतीने साजरे करा, असे आमचे मत आहे. टिळकांनी समाजातील सर्व घटक एकत्र येण्याच्या उद्देशाने सार्वजनिक उत्सव सुरू केले होते मात्र सध्या हा उत्सव या नगरसेवकाचा, त्या आमदारांचा असा वैयक्तीक बनला आहे. सण रस्त्यावर साजरे करून त्याचा मुळ उद्देशही हरवू लागल्याने न्यायालयाला हस्तक्षेप करून त्या संदर्भात नियमावली जाहिर करावी लागली. ही नियमावली धर्माच्या विरोधात आहे असे म्हणता कामा नये तर ही नियमावली सण चांगल्या पध्दतीन साजरा करण्यासाठी घालून दिलेली आहे.
– डॉ. महेश बेडेकर,
सामाजिक कार्यकर्ते