ठाणे: येथील माजिवाडा भागातील पार्कंग प्लाझा इमारतीत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीसाठी पालिकेच्या हालचाली सुरू असतानाच, त्यास भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी विरोध दर्शविला आहे. या भागातील रस्त्यांवर वाहने उभी केली जात असल्यामुळे कोंडीची समस्या निर्माण होत असून ती कमी करण्यासाठी पार्किंग प्लाझा येथे रुग्णालयऐवजी वाहनतळ सुरू करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. यामुळे नागरिकांना वाहनतळाची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवॉकवर फेरीवाल्यांचे बस्तान

ठाणे येथील माजिवाडा भागात पालिकेने पार्किंग प्लाझा इमारत उभारली आहे. करोना काळात रुग्ण उपचारासाठी रुग्णालये अपुरी पडत होती. त्यावेळी पालिकेने पार्किंग प्लाझा येथे तात्पुरत्या स्वरुपात ११०० खाटांचे करोना रुग्णालय उभारले होते. त्याचबरोबर करोना लसीकरण मोहिमही याच ठिकाणी राबविण्यात आली होती. करोना संसर्ग कमी झाल्यानंतर हे रुग्णालय बंद करण्यात आले. ही इमारत वाहनतळासाठी उभारण्यात आली असली तरी त्याठिकाणी रुग्णालय उभारणीचा प्रस्ताव पुढे आला होता. या जागेत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याची घोषणा आयुक्त अभिजीत बांगर यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. हि घोषणा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालिकेच्या हालचाली सुरू असतानाच, त्यास भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी विरोध दर्शविला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील जलमय चाळींमधील कुटुंबीयांची सुटका

पार्किंग प्लाझा इमारतीशेजारीच जुपिटर रुग्णालय आणि विवियाना मॉल आहे. तेथे येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. हे नागरिक सेवा रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करतात. यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन मोठी कोंडी होते. या रस्त्यावरून शनिवारी आणि रविवारी सायंकाळी पाच मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तासांचा कालावधी लागतो. महापालिकेची पार्किंग प्लाझा इमारतीत वाहनतळ सुरू केल्यास या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होईल. त्याचबरोबरच माजिवडा, पोखरण रोड क्र. २, जुपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक आणि मॉलमधील ग्राहकांना वाहनतळासाठी जागा मिळेल. महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल, असा दावा वाघुले यांनी केला आहे. पार्किंग प्लाझाचा वापर केवळ वाहनतळासाठी करावा आणि तो सामान्यांसाठी खुला करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.