|| पूर्वा साडविलकर

आवश्यक जिन्नसांच्या किमतीत गतवर्षीच्या तुलनेत घट

ठाणे : वाढत्या महागाईची झळ बसल्याने गेल्या वर्षी गोडव्यातही कडू ठरलेली मकरसंक्रांत यंदा मात्र गोड ठरणार आहे. किरकोळ बाजारात तिळाच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० रुपयांनी घट झाली असून खोबरे, शेंगदाणे आणि गुळाच्या किमतीही कमी झाल्या आहेत. त्यामुळे यंदा तिळाच्या लाडूंचा खर्च तुलनेने कमी असेल.

यंदाच्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे कृषी मालाचे दर गेल्या काही महिन्यांपासून चढेच आहेत. भाज्या महाग असल्यामुळे यंदा तिळाचे लाडू बनविण्यासाठी लागणारा जिन्नसही तसाच महाग असेल अशी शक्यता व्यापारी सुरुवातीला व्यक्त करत होते. मात्र, सध्या तरी त्या विपरीत चित्र दिसत आहे. देशांतर्गत तिळाचे उत्पादन कमी झाले असले तरी, परदेशातून पुरेशा प्रमाणात आवक झाली आहे. त्यामुळे गेल्या तीन चार महिन्यांच्या तुलनेत तिळाचे दर वाढले आहेत. मात्र, हे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात २२० रुपये किलोने मिळणाऱ्या तिळाच्या किमतीत या वर्षी ४० रुपयांची घसरण झाली असून तीळ १८० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जात आहे.

तिळाखेरीज तीळगुळातील अन्य जिन्नसही गतवर्षीच्या तुलनेत स्वस्त झाले आहेत. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात २४० रुपये किलोने विकले जाणाऱ्या खोबऱ्याच्या किमतीत ६० रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात १८० रुपये किलो या दराने खोबरे विकले जात आहे. किरकोळ बाजारात गेल्या वर्षी १३० रुपये किलोने विकले जाणारे शेंगदाणे सध्या १२० रुपये किलोने विकले जात आहेत. गेल्या वर्षी ६५ रुपये किलो दराने विकला जाणारा गूळ यंदा ५५ रुपये किलो असल्याची माहिती किरकोळ विक्रेते किशोर भानुशाली यांनी दिली. नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १ ते ६ जानेवारी या कालावधीत ९८७ क्विंटल तिळाची , ३,५११ क्विंटल गुळाची तर सुक्या खोबऱ्याची १,०३८ क्विंटल तसेच, शेंगदाण्याची ६,८८२ क्विंटल  आवक झाली असल्याची माहिती बाजारभाव विभागाचे अधिकारी सुनील सिंगकर यांनी दिली आहे. तिळाचे लाडू तयार करणाऱ्या जिन्नसांचे दर कमी झाल्याने यंदाच्या वर्षी तयार तिळाच्या लाडूच्या किमतीत ४० ते ६० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी २४० ते २८० रुपये किलोने मिळणारे तयार तिळाचे लाडू सध्या १८० ते २४० रुपये किलोने बाजारात मिळत आहेत.

हलव्याचे दागिने यंदाही महाग

मकरसंक्रांतीला नववधू आणि लहान बाळाला हलव्याच्या दागिन्यांनी सजवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हलव्याचे दागिने तयार करणाऱ्या कारागिरांनी मजुरी वाढवल्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गेल्या वर्षी नववधूंचे दागिने १,२५० रुपयांनी मिळत होते, तर यंदाच्या वर्षी १,३०० रुपयांनी हे दागिने मिळत आहेत. त्याचबरोबर, मागील वर्षी ४०० रुपयांनी मिळणारे लहान बाळाचे दागिने यंदाच्या वर्षी ५०० रुपयांनी मिळत आहेत. सजावटीचे सामान महाग झाल्याने या दागिन्याच्या किमतीत वाढ झाल्याची माहिती हलव्याचे दागिने तयार करणाऱ्या प्रीती आर्येमाने यांनी दिली.