‘मलाबार रावेन’ हे स्वॅलोटेल कुळातील एक मध्यम आकाराचे ( १०० मि.मि.) फुलपाखरू आहे. जरी हे स्वॅलोटेल फुलपाखरू असले तरी त्याला इतरांप्रमाणे शेपटी नसते.

तसं हे फुलपाखरू नेहमी दिसण्यातले नाही. सह्य़ाद्रीच्या उंच डोंगरांमध्ये ८००/९००मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशातील दाट जंगलांमध्ये मात्र ही हमखास आढळतात. केरळ आणि कर्नाटकमधील भागात याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच याला ‘मलाबार रावेन’ हे नाव दिले गेले आहे. आपल्या जवळपासच्या डोंगरातही उंचीवर हे फुलपाखरू आढळते.

‘मलाबार रावेन’कडे स्वत:च्या बचावासाठी विशेष साधन नसल्यामुळे हे ‘कॉमन क्रो’ फुलपाखराच्या रूपाची नक्कल करते. अशीच नक्कल ‘कॉमन माइम’सुद्धा करते. मात्र ‘मलाबार रावेन’ जास्त वेगाने उडते. इतर बहुतेकांप्रमाणे ही फुलपाखरे फुलावर आढळत नाहीत. दलदलीमधील पाणी आणि क्षार शोषताना ते हमखास दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘मलाबार रावेन’ हे फिक्कट चॉकलेटी झाक असणारे काळ्या रंगाचे फुलपाखरू आहे. याच्या पुढच्या पंखांच्या मध्यावर एक पांढरा लहानसा ठिपका असतो. पुढील तसेच मागील पंखांच्या टोकाच्या किनारीला पांढऱ्या ठिपक्यांच्या दोन रांगा असतात. त्यापैकी मागील पंखांवरील ठिपके हे जास्त मोठे असतात. शिवाय दोन्ही पंखांवरच्या आतल्या रांगेतील ठिपके जास्त मोठे असतात. या फुलपाखराचे सुरवंट वनलिंबू किंवा किरमीरा आणि इतर झाडांची पाने खाऊन वाढतात. एका वर्षांत याच्या दोन किंवा तीन पिढय़ा जन्मास येतात.